| रेवदंडा | प्रतिनिधी |
चौल भोवाळे येथे इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम असलेल्या चौल नगरीत, श्री दत्त पौर्णिमा ग्रुपतर्फे आयोजित वार्षिक महाप्रसाद सोहळा भक्तिभावाने पार पडला. भाऊबीजेनंतरचा गुरुवार, दि.30 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सोहळ्यात श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग यांचे अद्वितीय सौंदर्य खुलून दिसले.
उंच पायऱ्यांवर वसलेले हे पुरातन दत्तदेवस्थान भक्तांसाठी श्रद्धेचे शक्तिपीठ मानले जाते. येथे दर्शन घेतल्यावर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा खोल विश्वास स्थानिक आणि आगंतुक भक्तांच्या मनात आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. दत्तगुरूंच्या जयघोषात वातावरण पवित्र झाले होते. सभोवतालचा परिसर त्या दिवशी अधिकच रमणीय भासत होता. डोंगरावर पसरलेली हिरवळ, मंद वाऱ्याने डोलणारी झाडे आणि थोड्याच अंतरावर दिसणारा रेवदंडा खाडीचा किनारा या सर्व निसर्गसंपदेमुळे भक्तीची अनुभूती अधिक गाढ झाली.
महाप्रसादात विविध पारंपरिक पदार्थांची चव सर्वांना रुचली. सर्व वयोगटातील भक्तांनी भक्तिभावाने प्रसादाचा आस्वाद घेतला. श्री दत्त पौर्णिमा ग्रुपच्या सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि आदरयुक्त पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. चौलचा हा सोहळा केवळ धार्मिक नाही, तर समाजातील सद्भाव, एकता आणि संस्कृती जपणारा पर्व ठरला. गुरुदेव दत्तांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळात अशा भक्तिसोहळ्यांमधून समाजात श्रद्धा आणि प्रेमाचे बंध अधिक मजबूत होतील, अशी ग्रामस्थांची भावना होती.







