। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. सध्या राजकोट किल्ल्यावर खोदकाम सुरू आहे. तर, एका मोठ्या शिल्पकारावर संपूर्ण पुतळा उभारणीच्या कामाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
राजकोट किल्ल्यावर सध्या 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनवण्याच्या कामाला सूरुवात झाली आहे. या चौथर्यावरच शिवरायांचा 60 फूट उंच पुतळा उभा राहणार आहे. राज्य शासनाने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. इतर निविदांची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. यामुळे राज्य सरकारने पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. त्यांना देशभरात मोठमोठे पुतळे दर्जेदार पद्धतीने उभरण्याचा मोठा अनुभव आहे.
पुतळ्याच्या बांधकामासाठी अटी
राजकोट किल्ल्यावर कांस्य धातूपासून 8 मी.मी. जाडीचा शिवरायांचा पुतळा तयार होत आहे. डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची 60 फूट इतकी असणार आहे. तर, पुतळा ज्यावर उभा असेल तो 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनवण्यात येणार आहे. निविदेनुसार 100 वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर, 10 वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घालण्यात आली आहे.