| श्रीवर्धन | मिलिंद जाधव |
संभाजी महाराजांची औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या हा येसूबाईंसह स्वराज्यावर झालेला सर्वात मोठा आघात होता.या अगोदर शंभूराजांबरोबर तेवीस वर्षे संसार करताना स्वराज्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. राज्यकारभारतल्या प्रत्येक निर्णयाचा कागद त्यांच्या नजरेखालून जात होता. शंभूराजांनी त्यांना दिलेल्या “सखी राज्ञी जयती” या शिक्क्याशिवाय तो मंजूर होत नव्हता.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले तेव्हा शंभूराजांना मथुरेत सुरक्षित ठेवून,गनिमाला गाफील ठेवण्यासाठी त्यांनी शंभूराजांच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरवली होती. राजगडावर शंभूराजांचं दहावं-बारावंसुद्धा उरकलं गेलं. पती हयात असताना येसूबाईंना त्यावेळी वैधव्याचं जीवन जगावं लागलं. कशासाठी? तर फक्त आणि फक्त स्वराज्यहितासाठी. इथूनच त्यांच्या त्यागाला आणि सत्व परीक्षेला सुरुवात झाली.
1689 साली शंभूराजांच्या मृत्यूचं आभाळाएवढया दुःखाचं भयाण वास्तव पचवून न डगमगता त्यांनी धैर्याने स्वराज्यरक्षणाला प्राधान्य दिलं. औरंगजेबाच्या सैन्याने मातब्बर सरदारांसह रायगडाला टाकलेल्या भल्या मोठ्या फौजेच्या वेढ्यात, येसूबाईंसह शाहू आणि राजारामांचं संपूर्ण कुटूंब अडकून पडलं. यावेळी स्वराज्याची सर्व जबाबदारी येसूबाईंवर होती. अशा अत्यंत बिकट प्रसंगात त्यांच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाने स्वराज्य धुळीला मिळालं असतं. पण, येसूबाईंनी रायगडावर असलेल्या मातब्बर सरदारांच्या उपस्थितीत खलबतं सुरु केली. अशा वेळी आपल्या पुत्राला त्या गादीवर बसवतील असा सर्वांचा समज होता. मात्र, पुत्रप्रेम बाजूला ठेवून अठरा वर्षाच्या जबाबदार राजारामांचं मंचकारोहण करून त्यांनी स्वराज्यहिताला प्राधान्य दिलं.
आपण सर्वजण शत्रूच्या तावडीत सापडलो तर स्वराज्य नेस्तनाबूत होईल. अशा वेळी राजाराम महाराजांनी आपल्या कुटुंबकबिल्यासह निसटून जिंजीला जाऊन तिथे राज्य वाढवावे. तोपर्यंत आम्ही किल्ला लढवू. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतला रयतेच्या मनातला शिरस्ता येसूबाईंनी राजारामांच्या बाबतीत लागू केला. नंतर येऊन राजाराम महाराजांनी आम्हाला वेढ्यातून सोडवावं. तोपर्यंत आम्ही किल्ला लढवू.
ठरल्याप्रमाणे राजाराम महाराज त्या वेढ्यातून निसटले. इकडे तुटपुंज्या सैन्यानिशी मातब्बर सरदारांच्या जोडीने, येसूबाईंच्या नेतृत्वात रायगड निकराने लढू लागला. पायथ्याला संताजी घोरपडे, धनाजी जाधव बाहेरून वेढ्यावर हल्ला करून जुल्फीकार खानाच्या सैन्याचे लचके तोडत होते. जवळजवळ आठ ते दहा महिने एक स्त्री अफाट जिद्दीने स्वराज्यावरच्या प्रेमाखातर बलाढ्य फौजेला झुंज देते. हे बघून औरंगजेब चवताळला.
याच वेळेला गनिमाने एक धूर्त चाल खेळली. रायगडावरून जिंजीला जाणाऱ्या राजाराम महाराजांना अटक झाल्याची खबर येसूबाईंच्या कानावर येऊन आदळली. येसूबाई सुन्न झाल्या.शंभू राजांना अटक झाल्यावर जे हाल त्यांचे झाले, तेच राजाराम महाराजांचे होतील, म्हणून येसूबाईंनी जुल्फीकारखानाबरोबर तहाची बोलणी सुरू केली. कारण, सूर्याजी पिसाळासह काही फितूर लोकांनी औरंगजेबाच्या सैन्याला रायगडावरचे छुपे रस्ते दाखवायला सुरुवात केली होती. अस्तनीतल्या निखाऱ्यांची बेईमान औलाद फितुरीच्या तेजाने झळाळत होती. या सर्व बाबींचा विचार करून रयतेच्या आणि एकंदरीतच स्वराज्यातल्या आया बहिणींच्या अब्रूच्या सुरक्षेची हमी घेऊन त्या बदल्यात रायगड औरंगजेबाच्या ताब्यात देण्याचं ठरलं. अखेर तीन नोव्हेंबर 1689 रोजी स्वराज्याची राजधानी असलेला बलदंड रायगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि येसूबाई आपल्या मुलासह औरंगजेबाच्या कैदेत अडकल्या.
तब्बल तीस वर्षे कैदेत राहण्याचा हा जीवावर बेतणारा निर्णय स्वराज्याप्रति असलेल्या त्यांच्या त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण होता. याही परिस्थितीत मुघलांच्या कैदेत यातना सोसणाऱ्या येसूबाईंचा स्वाभिमान मात्र कैद झाला नव्हता. तो धगधगतच होता. त्या कैदेतही त्यांनी छोट्या शाहूंना स्वाभिमानाचे धडे दिले. 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने येसूबाईंना कैदेतच ठेवून छोट्या शाहूंची सुटका केली. 1708 साली शाहूंचा राज्याभिषेक झाल्यावर सातारा ही मराठ्यांची नवी राजधानी म्हणून उदयाला आली. अखेर 1719 साली जवळजवळ तीस वर्षांच्या यातनामय कैदेतून सुटका झाल्यावर, आपला पुत्र हिंदुस्थानवर राज्य करत असल्याचं पाहून त्या कृतकृत्य झाल्या.
जे स्वराज्य कोणत्याही क्षणी नेस्तनाबूत होऊ शकलं असतं, ते स्वराज्य आपल्या धाडसी निर्णयाने आणि पराकोटीच्या त्यागाने अबाधित राहिलेलं पाहून त्यांनी 1728 साली अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच इतिहास येसूबाईंच्या त्यागाबद्दल फारसं बोलत नसला, तरी त्यांच्या अनन्यसाधारण त्यागामुळेच स्वराज्य अबाधित राहिलं, हे वास्तव आहे. साक्षात आगीच्या गोळ्याबरोबर संसार करताना स्वराज्यासाठी आपलं जीवन त्यागणाऱ्या त्याग आणि स्वाभिमानाची दुर्गा महाराणी येसूबाईंच्या चरणी नवरात्रीची दुसरी माळ कृतज्ञतापूर्वक अर्पण.







