संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील दंगलीत ठार झालेल्या पीडितांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा पाठिंबा जाहीर केला आहे. तशी घोषणा शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जनआंदोलनाची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती,कामगार संघटना संयुक्त कृती समिती, असंघटित कामगार संघर्ष समिती,हम भारत के लोग आणि नेशन फॉर फार्मस,सेंट्रल विस्टा विरोधी भारत चे नेते उपस्थित होते.यामध्ये कॉम्रेड प्रकाश रेड्डी, विद्या चव्हाण,शैलेंद्र कांबळे ,मेराज सिद्दीकी, विजय दळवी,शेकापचे कॉम्रेड राजू कोरडे, विश्‍वास उटगी ,फिरोज मिठीबोरवाला आदी नेते यावेळी उपस्थित होते.


यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना या नेतेमंडळींनी मोदी तसेच योगी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारने पारित केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे आम्ही मोदी सरकारने संमत केलेल्या चार कामगार विरोधी संहिता आणि वीज सुधारणा विधेयक 2021 रद्द करण्याची मागणी करत आहोत,असेही सुचित करण्यात आले.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चामध्ये सहभागी असलेल्या विविध डावे आणि लोकशाहीवादी राजकीय पक्ष, कामगार संघटना, जनवादी संघटना, महिला, विद्यार्थी व युवा संघटना यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहे. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत, आम्ही संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात स्थानिक मेळावे आणि मोठ्या जाहीर सभा आयोजित होत्या असे सांगण्यात आले.


लखीमपूर खेरी येथे झालेल्या निर्घृण हत्याकांडा संदर्भात संयुक्त शेतकरी कामगार मोर्च्याने खालील प्रमाणे मागण्या केल्या आहेत.यामध्ये 100 पेक्षा जास्त प्रत्यक्षदर्शींनी ओळखलेल्या आशिष मिश्राला ताबडतोब अटक करावी. तो 4 शेतकरी आणि 1 पत्रकाराची हत्या करणारी कार चालवत होता. या मुख्य आरोप्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यूपी पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक करायला हवी होती, पण तो अजूनही मोकाट फिरत आहे. मुक्त आणि निष्पक्ष तपास होण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री (एमओएस) अजय मिश्रा यांनी त्वरित राजीनामा द्यावा. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींवर कसा दबाव आणला जातो, धमक्या दिल्या जातात, आणि तसेच जिवानिशी मारले जाते तपास न्यायपालिकेच्याच देखरेखी खाली व्हावा आणि सर्वोच्च/उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायधीशांमार्फत तपासणी व्हावी.


उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपींना ताबडतोब अटक करावी अन्यथा शेतकरी आंदोलन तीव्र करतील आणि रस्त्यावर उतरतील. महविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आम्ही नक्कीच पूर्णपणे समर्थन देतो. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला ऐतिहासिक बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करीत असल्याचे उपस्थित संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांनी पत्रकारांना सांगितले.

Exit mobile version