अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे देणार्या येणार्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण रविवारी ( 16 एप्रिल) खारघरला येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सरकारतर्फे सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी याच मैदानावर थोर निरुपणकार स्व.नानासाहेब धर्माधिकारी यांनाही तत्कालीन सरकारच्यावतीने प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ( 10 एप्रिल) खारघर येथे भेट देऊन तयारीच्या कामाचा आढावा घेतला.तसेच आवश्यक त्या सुचनाही केल्या. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून किमान 20 ते 25 लाखांचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबरोबरच वाहतुकीचे काटेकोरपणे नियोजन करण्याबाबत सुचना करण्यात आल्या. या सोहळ्यासाठी केंद्रीय तसेच राज्यस्तरातील मंत्री, नेते, पदाधिकारी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची सुचनाही शिंदे यांनी केल्या आहेत.