कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्राच्या बसेस फिरल्या माघारी

पुणे । वृत्तसंस्था ।
राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंधक दोन डोस नसल्याच्या कारणावरून मंगळवारी (ता. 2) रात्री 13 खासगी बसेस परत महाराष्ट्रात पाठवल्या. निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक नाक्यावर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र व इतर राज्यातून येणार्‍या प्रवाशांचा आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंधक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून कर्नाटकात जात असलेल्या खासगी बसेसची तपासणी या ठिकाणी करण्यात आली. या बसमध्ये प्रवाशांचे आरटीपीसीआर रिपोर्ट व डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्याने बसेस परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आल्या आहेत.कोगनोळी येथील दूधगंगा नदीवर कर्नाटक सीमा तपासणी नाका गेल्या दोन वर्षभरापासून सुरू आहे. याठिकाणी गेल्या महिनाभरात काही प्रमाणात प्रवाशांना सूट देण्यात आली होती. पण महाराष्ट्रातील मुंबई व इतर ठिकाणी वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, राजू गोरखनावर यांच्यासह आरोग्य विभाग व पोलिस विभाग यांच्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version