| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महत्त्वाच्या शहरांत, जिल्ह्यांत पडद्यामागे प्रचंड राजकीय घडामोडी सुरु आहेत.
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये दोन, तीन तर काही ठिकाणी 5 वर्षांपासून प्रशासनाकडून कारभार चालवला जात आहे. निवडणुका न झाल्यामुळे तिथे सध्या प्रशासनाच्या अख्यत्यारित कामकाज सुरु आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने 2022 आधीचे आरक्षण कायम ठेवायचा आदेश देत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर निवडणूक आयोग तयारीला लागले आहे. त्यानुसार निवडणूक आयोग महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यात घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचनेचे काम सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जारी केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.






