अरे देवा! राज्याची चिंता वाढतेय…ओमिक्रॉन बळावतोय

। मुंबई । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने कर्नाटकात शिरकाव केल्याचे समजताच महाराष्ट्र आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. सध्या देशात ओमिक्रॉनचे 23 रुग्ण आढळले असून त्यापैकी सर्वाधिक 11 रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. ओमिक्रॉन वाढत असल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली असल्याचे समोर आले आहे.

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूने सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या 23 वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.

दक्षिण आफ्रिकेतून 25 नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या 37 वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रवासी करोनाबाधित असल्याचे 29 नोव्हेंबरला आढळले होते. त्यामुळे त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेतला असता त्याच्याबरोबर राहिलेल्या 36 वर्षीय मैत्रिणीलाही करोनाची लागण झाल्याचे 30 नोव्हेंबरला आढळले होते. ही महिला 25 नोव्हेंबरला अमेरिकेतून मुंबईत आली होती. तिलाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे जनुकीय कर्मनिर्धारणादरम्यान स्पष्ट झाले.

शनिवारी डोंबिवलीत राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळला होता. त्यापाठोपाठ पिंपरीतील सहा आणि पुण्यातील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळले होते. आता आणखी दोन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील रुग्णसंख्या 10 झाली आहे. दक्षिण आफ्रिकेसह अतिजोखमीच्या देशांतून राज्यात आलेले 11 प्रवासी करोनाबाधित असल्याचे आढळले आहे. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

राजस्थान, कर्नाटक, गुजरात, दिल्लीमध्येही रुग्ण
महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणार्‍या दिल्लीमध्येही 5 डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलाय.

परदेशातून आलेल्या 263 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी
1 डिसेंबरपासून आफ्रिकेसह अतिजोखमीच्या देशांतून राज्यात सहा हजार 263 प्रवासी आले असून, या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. अन्य देशांमधून 28 हजार 437 प्रवासी आले असून, त्यातील 635 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या.

Exit mobile version