| उरण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र ऑलिंपिक असो.ला जवळपास 50 राज्य खेळ संघटना संलग्न आहेत. मात्र, त्यातील नेमक्याच खेळ संघटनांना महाराष्ट्र ऑलिंपिकच्या होणाऱ्या निवडणुकीला मतदानाचा अधिकार देण्यात आला असून बाकीच्या संघटनांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे या संघटनांनी एकत्र येत मंगळवारी (दि.23) उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी खेळ संघटनांचे पदाधिकारी व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू साखळी उपोषण करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना भोंडवे म्हाणाले की, महाराष्ट्र ऑलिंपिक असो.चे सरचिटणिस नामदेव शिरगावकर यांनी 15 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिंपिक असो.च्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यकम जाहीर केला. तसेच, या परिपत्रकासोबत निवडणुकीच्या मतदानाला पात्र 22 खेळ संघटनाची यादी जाहीर केली. या अगोदर झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असो.च्या निवडणुकीत 27 खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार देण्यात आलेले होते. तर, आता होणाऱ्या निवडणुकीत कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, स्विमिंग व हॅण्डबॉल या पाच खेळांना वगळून फक्त 22 राज्य खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ऑलिंपिक असो.चे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी संघटनेवर स्वतःचे वर्चस्व राहावे म्हणून जाणूनबुजून अनेक अधिकृत खेळ संघटनांना डावलल्याने महाराष्ट्रातील खेळांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.







