। मुंबई । वृत्तसंस्था ।
मागील दोन वर्षे महाराष्ट्र केसरी ही राज्यातील मानाची कुस्ती स्पर्धा कोरोनामुळे होऊ शकली नाही. परंतु यंदा ४ एप्रिलपासून साताऱ्यात ही मानाची कुस्ती आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रातील असंख्य युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची समजली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुस्तीपटू वर्षभर मेहनत घेत असतात. यंदा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेकडून या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत स्पर्धेचे ठिकाण व कालावधी याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोरोना संबंधित नियमांचे पालन करूनच खेळवण्यात येणार आहे.
९०० खेळाडूंचा सहभाग
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा माती व गादी या दोन विभागात रंगणार आहे. या दोन्ही विभागांत मिळून ९०० कुस्तीपटूंचा सहभाग असणार आहे. तसेच १०० ते १५० पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचाही यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे एकूण एक हजार ते १२०० व्यक्तींसाठी सुविधा पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेसह आयोजकांवरही असणार आहे.