राज्यात पावसाची विश्रांती

पाच दिवस काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता
। पुणे । वृत्तसंस्था ।
राज्यात गेल्या आठवडयात जोरदार बरसलेल्या मोसमी पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. पुढील चार ते पाच दिवस कोठेही जोरदार पावसाचा इशारा नाही. काही ठिकाणी केवळ हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मोसमी वार्‍यांनी सध्या देशाचा नव्वद टक्के भाग व्यापून राजधानी दिल्लीत धडक दिली आहे. मात्र, या भागात सध्या मोठया पावसाला पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. सद्य:स्थितीत देशाच्या उत्तर-पूर्व भागांत पाऊस होतो आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा गेल्या आठवडयात कार्यरत होता. पश्‍चिमेकडून येणारी हवा समुद्रातून मोठया प्रमाणावरील बाष्प भूभागाकडे आणत होती. त्यामुळे प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुंबई, ठाणे परिसरासह पालघर भागात अतिवृष्टी झाली.मध्य महाराष्ट्रातील पश्‍चिम विभागातील घाट क्षेत्रांत मोठया प्रमाणावर पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ आणि मराठवाडयातही काही भागांत पाऊस झाला.मोसमी वार्‍यांनी सोमवारी देशाच्या विविध भागांत प्रगती केली. नियोजित वेळेनुसार ते 25 ते 30 जूनच्या दरम्यान दिल्लीपर्यंत पोहचत असतात. मात्र, यंदा त्यांनी वेळेपूर्वीत या भागांत प्रवास केला.जोरदार पावसाला पोषक असलेली स्थिती निवळली आहे. त्यामुळे राज्यात कोठेही मोठया पावसाचा इशारा नाही. पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका पाऊस होईल. बहुतांश भागांत दुपारी आकाश निरभ्र राहणार असल्याने राज्याच्या काही भागांत दिवसाच्या कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

Exit mobile version