निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांचे आवाहन; पात्र मतदार कायम राहणार
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात राबविण्यात येणारी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार असून, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव विनाकारण वगळले जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले. तसेच नागरिकांनी 2002 सालच्या मतदार यादीशी आपले किंवा आपल्या पालकांचे नाव जुळते का, याची खातरजमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची घोषणा केली असून, या अंतर्गत राज्यातील तब्बल 9 कोटी 86 लाखांहून अधिक मतदारांच्या तपशीलांची घराघरांत जाऊन पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील ही मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून यासाठी 1 लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी घराघरांत जाऊन मतदारांची माहिती तपासणार, डुप्लिकेट नावे शोधणार तसेच स्थलांतरित मतदारांची नोंद अद्ययावत करणार आहेत.
मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये पुनर्विकासामुळे अनेक नागरिक स्थलांतरित झाले असल्याने संबंधितांनी स्थानिक बीएलओशी संपर्क साधून आवश्यक फॉर्म भरावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच बीएलओ भेटीदरम्यान घरी कोणी नसल्यास 29 जुलैनंतरही मतदारांना नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध राहणार असल्याचे चोकलिंगम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नागरिकांना घरबसल्या माहिती अद्ययावत करता यावी यासाठी निवडणूक आयोगाने ‘ऑनलाईन सेल्फ मॅपिंग’ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. पडताळणी प्रक्रियेदरम्यान मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संपूर्ण संधी दिली जाणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
मतदार पुनरीक्षण मोहिमेचे वेळापत्रक
20 ते 29 जून 2026 : गणना अर्जांची छपाई व बीएलओ प्रशिक्षण
30 जून ते 29 जुलै 2026 : घराघरांत जाऊन अर्ज वितरण व संकलन
5 ऑगस्ट 2026 : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 : दावे व हरकती स्वीकारल्या जाणार
3 ऑक्टोबर 2026 पर्यंत : दावे-हरकतींची छाननी व निर्णय
7 ऑक्टोबर 2026 : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबवली जाईल. नागरिकांनी 2002 च्या मतदारयादीत आपले किंवा पालकाचे नाव जुळवून पाहावे.
एस. चोकलिंगम,
राज्य निवडणूक अधिकारी
