। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या वतीने बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र.9, बाणेर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 15जुलै रोजी सायंकाळी 5 वा. श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॉक्सिंग हॉल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे कबड्डी दिन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरी करण्यात येतो. यानिमित्त किशोर, कुमार व खुलागट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळताना विशेष प्राविण्य दाखविणार्या उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करण्यात येते. कबड्डी क्षेत्रात सातत्याने कार्य करणार्या ज्येष्ठ कार्यकर्ता, ज्येष्ठ पंच, तसेच ज्येष्ठ खेळाडू, सातत्यपूर्ण स्पर्धा आयोजक संस्था व कबड्डीच्या प्रसिद्धीसाठी अविरत मेहनत घेणार्या पत्रकार व इतरांचा या वेळी गौरव करण्यात येतो. शिवाय कबड्डी खेळ, खेळाडू व संस्था यांच्या विकास आणि प्रसाराकरिता अमूल्य वेळ देणार्या ज्येष्ठ संघटकाला कृतज्ञता तसेच स्व. रमेश देवाडीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
पुरस्कार वितरण सोहळा संघटनेचे अध्यक्ष अजितद पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. या प्रसंगी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर, भाई जगताप, सुनील तटकरे, ओमप्रकाश बकोरिया, अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कर्त्यांना उत्तेजन व प्रोत्साहन देण्याकरिता आपण सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करावा असे आव्हान संघटनेचे सचिव आस्वाद पाटील व आयोजक बाबुराव चांदेरे यांनी प्रसार माध्यमा मार्फत केले आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभा
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 15 जुलै रोजी सायंकाळी 4 वा. कॉन्फरन्स हॉल, मुख्य इमारत, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी संघटनेच्या सर्व अधिकृत प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहून सभेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यास सहकार्य करावे असे आवाहन सचिव आस्वाद पाटील यांनी सर्व पदाधिकारी, संलग्न जिल्हा प्रतिनिधी, आजीव सदस्य व अधिकृत प्रतिनिधी यांना केले आहे.