| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय तसेच वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित चार दिवसीय खेलो इंडिया अस्मिता पश्चिम विभागीय महिला किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच इंदोर पब्लिक स्कूल, इंदोर येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पश्चिम विभागातील मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, गोवा तसेच दमण व दीव येथील गुणवंत महिला किकबॉक्सिंग खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. उत्कृष्ट व दमदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. महाराष्ट्र संघाकडून स्पोर्टस् किकबॉक्सिंग असोसिएशन, मुंबई शहर येथील खेळाडू अश्विनी जांबळे हिने पॉइंट फाइट – 55 वजनी सीनियर गटात सुवर्णपदक जिंकून संघाच्या यशात मोलाची भर घातली. याशिवाय कशिस जैस्वार हिने क्रिएटिव्ह फॉर्म प्रकारात कांस्यपदक, तर प्रीशा पिल्लई हिने पॉइंट फाइट +55 वजनी गटात कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राच्या यशाची पताका उंचावली. या यशामागे स्पोर्टस किक बॉक्सिंग असोसिएशन, मुंबई शहर तसेच गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून मिळालेल्या नियमित सराव वर्ग व दर्जेदार प्रशिक्षणाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच आंतरराष्ट्रीय रेफरी व प्रशिक्षक उमेश मुरकर, विघ्नेश मुरकर आणि राहुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंच्या कामगिरीला अधिक बळ मिळाले. महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे राज्याने किकबॉक्सिंग क्षेत्रातील आपले अव्वल स्थान पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित केले आहे.






