महाराष्ट्राचा महिला, पुरुष संघ बाद फेरीत

| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघानी 36व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेतील कबड्डी विभागात दुसर्‍या विजयासह बाद फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला. कंकरिया अहमदाबाद येथील ईका इरिना ट्रान्स बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या महिलांच्या अ गटातील दुसर्‍या साखळी सामन्यात महाराष्ट्राने यजमान गुजरातचा 46-22 असा सहज पराभव केला. महाराष्ट्राने आज आपली हुकमी चढाईपटू सोनाली शिंगटेला विश्रांती दिली. आक्रमक सुरुवात करीत महाराष्ट्राने पूर्वार्धातच लोण देत 20-10 अशी आघाडी घेत दमदार सुरुवात केली. उत्तरार्धाच्या खेळात आपला खेळ आणखी उंचावत 26गुणांची भर घालत 24 गुणांनी सामना आपल्या नावे केला. पूजा यादव, मेघा कदम यांच्या झंजावाती चढाया त्याला रेखा सावंत, अंकिता जगताप यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय एवढ्या मोठ्या फरकाने जिंकता आला. महाराष्ट्राची पुढील लढत बिहारशी होईल.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने देखील अ गट साखळीतील दुसर्‍या सामन्यात चंदीगडचे आव्हान असे परतवून लावत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले. सुरुवाती पासून झंजावाती खेळ करीत पहिल्या डावातच प्रतिस्पर्ध्यावर 2 लोण देत 28-09 अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. दुसर्‍या डावात त्याच खेळाची पुनरावृत्ती करीत व अधिक जोमाने खेळ करीत 32 गुणांची कमाई करीत आपला विजय सोपा केला. पंकज मोहिते, असलम इनामदार, आकाश शिंदे यांच्या झंजावाती चढायांनी चंदीगडचा बचाव खिळखिळा करून टाकला. तर संघनायक शंकर गदई, किरण मगर यांचा भक्कम बचाव यामुळे हा विजय मिळविणे सहज शक्य झाले. आता महाराष्ट्राचा शेवटचा सामना सेनादलशी होईल. हा सामना या गटातील विजेता व उपविजेता संघ कोण? हे ठरवेल.

Exit mobile version