| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी चषकाच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीतील महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिॲलिटी शोमधील कलाकारांनी गुरुवारी (दि.20) सायंकाळी कुरुळमधील आझाद मैदानाला भेट दिली. प्रत्यक्ष खेळाचा आनंद त्यांनी घेत प्रेक्षकांसोबतही गप्पागोष्टी केल्या. टिव्हीवर आपल्या कलेतून नेहमी रसिकांना हसविणारे कलाकार प्रत्यक्ष भेटल्याने प्रेक्षकांमध्ये आनंद निर्माण झाला. यावेळी या कलाकारांनी हास्यजत्रामधील शोमधील काही अभिनय करीत कलाकारांना पोट धरून हसविण्याचे काम कलाकारांनी केले.
पीएनपी चषक 2025 टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिॲलिटी शोमधील श्रमेश बेटकर, मंदार मांडवकर, आणि निखिल बने यांनी भेट दिली. क्रिकेटचे सामने बघण्यामध्ये ते मग्न झाले. अखेर त्यांचा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी प्रत्यक्ष मैदानात जाऊन हातात बॅट आणि बॉल घेऊन क्रिकेट खेळाला सुरुवात केली. जोरदार फटकेबाजी करीत या खेळाचा आनंद त्यांनी मनमुरादपणे लुटला. त्यानंतर त्यांनी प्रेक्षक गॅलरीत जाऊन प्रेक्षकांसोबत संवाद साधला. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकार प्रत्यक्ष भेटायला आल्यावर क्रीडा प्रेमींचा आनंद द्वीगुणीत झाला. प्रेक्षकांनीदेखील या कालाकारांच्या सोबत गप्पा गोष्टी केल्या. आपल्या शैलीत या कलाकारांनी प्रेक्षकांसोबत संवाद साधला. लहान मुलांपासून तरुण मंडळी व महिलांनीदेखील या कलाकारांसोबत संवाद साधत हास्यजत्रा मालिकेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच, पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेबाबतही कौतूक करण्यात आले. यावेळी या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यापासून छायाचित्र काढण्याचा मोह अनेकांमध्ये निर्माण झाला. कलाकारदेखील सर्वांसोबत सेल्फी काढण्यासाठी सामील झाल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, दूसऱ्या दिवशीचा पहिला उद्घाटनीय सामना वळके ॲव्हेंजर्स आणि नांदगाव निजांस या संघामध्ये सामना झाला. यामध्ये वळके संघाने पाच षटकात 69 धावा करीत नांदगाव संघासमोर विजयासाठी 70 धावांचे लक्ष समोर ठेवले होते. या संघातील खेळाडूंनी विजयाची पराकाष्टा केली. मात्र, नांदगाव संघ पाच षटकांत फक्त 63 धावाच करू शकला. त्यामुळे वळके ॲव्हेंजर्स संघ 6 धावांनी विजयी ठरला. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात आवास अल्फाज आणि रोहा रेंजर्स या संघामध्ये लढत सुरु झाली. सुरुवातीला आवास संघाने पाच षटकात 63 धावा केल्या. रोहा संघासमोर विजयासाठी 64 धावांची आवश्यकता होती. रोहा संघाला पाच षटकांत 52 धावा करीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आवास अल्फाज संघ 11 धावांनी विजयी ठरला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात अलिबाग वॉरियर्स आणि खंडाळे स्टेलियन्स या संघामध्ये लढत सुरु झाली. सुरुवातीला खंडाळे संघाने पाच षटकात 71 धावा केल्या. अलिबाग संघाला विजयासाठी 72 धावांची आवश्यकता होती. मात्र पाच षटकात या संघाने फक्त 56 धावा केल्या. त्यामुळे खंडाळे स्टेलीयन्स संघ 15 धावांनी विजयी ठरला. चौथ्या सामन्यात वरसोली चॅलेंजर्स आणि मुरूड डिफेंडर्स या संघामध्ये लढत झाली. या सामन्यात वरसोली संघाने पाच षटकात 54 धावा करत मुरूड संघासमोर 55 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, मुरूड संघाने चार षटकांत 56 धावात करत 9 गडी राखून वरसोली संघावर विजय मिळविला आहे. त्यानंतर स्पर्धेतील पाचव्या सामन्यात पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात विजयी झालेले वळके ॲव्हेंजर्स आणि खंडाळे स्टेलीयन्स या संघामध्ये सामन खेळवण्यात आला. यावेळी खंडाळे संघाने पाच षटकात 49 धावा केल्या. त्यामुळे वल्के संघाला विजयासाठी 50 धावांची गरज होती. मात्र, वल्के संघाने पाच षटकांत 51 धावा करत सहजरित्या लक्ष गाठले.
सहाव्या सामन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातील विजेते आवास अल्फास आणि मुरूड डिफेंडर्स या संघामध्ये सामना झाला. यावेळी मुरूड संघाने 71 धावा केल्या. मात्र आवासच्या संघाने 72 धावांचे लक्ष गाठताना मुरूडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यांना पाच षटकांत फक्त 33 धावाच करता आल्या.
सातव्या सामन्यात पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात पराभूत झालेले नांदगाव निंजास आणि अलिबाग वॉरियर्स यांच्यात सामना खेळवला गेला. यावेळी नांदगाव संघाने पाच षटकांत 49 धावा केल्या. अलिबाग संघाला जिंकण्यासाठी 50 धावांची गरज होती. मात्र, त्यांना पाच षटकांत 39 धावाच करता आल्या. त्यामुळे नांदगाव संघ 10 धावांनी विजयी ठरला आहे. आठवा सामना रोहा रेंजर्स आणि वरसोली चॅलेंजर्स या संघामध्ये खेळवण्यात आला. रोहा संघाने पाच षटकात 42 धावा केल्या. वरसोली संघासमोर विजयासाठी 43 धावांची आवश्यकता होती. वरसोली संघाने तीन षटाकांतच 44 धावा करत रोहा संघावर विजय मिळविला आहे.
नववा सामना खंडाळे स्टेलीयन्स आणि नांदगाव निंजास या संघांमध्ये नंतरचा सामना खेळविण्यात आला. यावेळी नांदगाव संघाने पाच षटकांत 71 धावा केल्या. विजयासाठी खंडाळे संघाला 72 धावा करता आल्या नाहीत. फक्त 64 धावाच झाल्या. त्यामुळे नांदगाव संघ 7 धावांनी विजयी ठरला. शेवटचा सामना आवास अल्फाज आणि वरसोली चॅलेंजर्स संघामध्ये सामना खेळविण्यात आला. यावेळी आवास संघाला पाच षटकांत फक्त 32 धावाच करता आल्या. या लक्षाचा पाटलाग करताना वरसोली संघाने चौथ्या षटकातच 33 धावांचे लक्ष गाठत सात गडी राखून विजय मिळविला आहे.