। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणार्या जिंदाल समूहाच्या कंपन्यांमधील बांधकामाची व इतर जागेची फेरमोजणी करण्यासाठी माजी सरपंच अर्चना भोसले यांनी रोहा पंचायत समितीकडे पत्र पाठविले होते. मात्र, हे पत्र रद्द करण्यात यावे यासाठी विद्यमान सरपंच कलावती कोकळे यांनी रोहा पंचायत समितीकडे 10 फेब्रुवारी रोजी नव्याने पत्रव्यवहार केले होते. त्यामुळे ऐनघर नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा होत आहेत. दरम्यान, यासंदर्भात आपण वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचे माजी सरपंच अर्चना भोसले यांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील जिंदाल समूहाच्या कंपन्यांची सुमारे सात कोटी रुपयांची घरपट्टी कर थकीत आहे. याशिवाय या कंपन्यांच्या होणार्या फेरमोजणीमधून कंपनीमध्ये नव्याने झालेल्या बांधकामाचा, कंपनीच्या हद्दीचा तसेच, कंपनीकडून बेकायदेशीरपणे केला जाणार्या जमिनीच्या वापराचा तपास केला जाणार होता. या फेर मोजणीद्वारे कंपनीकडून दरवर्षी आकारला जाणार्या घरपट्टी करामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित होते. असे असतानाच ही मोजणी प्रक्रिया थांबवण्याचे नक्की कारण काय? असा प्रश्न माजी सरपंच अर्चना भोसले व स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात असून कंपनीशी असलेले हितसंबंध जोपासण्यासाठी ग्रामपंचायतच्या हद्दीतील गावांचा विकास थांबविणार का? तसेच, या संशयास्पद घडामोडींची चौकशी होणार का? असेही स्थानिक नागरिकांतून विचारले जात आहे.
दरम्यान, जिंदाल कंपनीच्या मिळकतीची संयुक्तिक फेरमोजणीची कार्यवाही करण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी कंपनी परिसरात भेट दिली असता सरपंच व उपसरपंच उपस्थित न राहिल्याने फेर मोजणीची कार्यवाही पूर्ण करता आली नसल्याचा शेरा रोहा पंचायत समितीमधून फेर मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांनी दिला आहे.