| तिरुअनंतपूरम | वृत्तसंस्था |
रणजी करंडकाच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राने केरळविरुद्ध अनिर्णित सामना खेळला. तिरुअनंतपूरममध्ये पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात 20 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी केरळ संघाने सुरुवात चांगली केली होती. मात्र, महाराष्ट्राने झुंज देत अखेर पहिल्या डावातील आघाडीसह हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. तिरुअनंतपूरमला झालेल्या या सामन्यात बऱ्याचदा पावसाचा व्यत्यय आला. हा सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना गुण मिळाले, मात्र महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेतल्याने त्यांना 3 गुण मिळाले, तर केरळला 1 गुण मिळाला. या सामन्यात शेवटच्या दिवशी महाराष्ट्राकडून दुसऱ्या डावात 2 बाद 224 धावा झाल्यानंतर डाव घोषित करण्यात आला. त्यानंतर सामना अनिर्णित राहिल, हे लक्षात घेत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी परस्परांच्या संमतीने हा सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्राकडून दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी यांनी 84 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. परंतु, अर्शिनला 34 धावांवर बाद झाला. दरम्यान, पृथ्वी शॉने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. महाराष्ट्रासाठी खेळताना त्याचे हे पहिले रणजी अर्धशतक ठरले. त्यानंतर सिद्धेश वीरसोबत डाव पुढे नेत असताना पृथ्वी शॉ 75 धावांची खेळी करून माघारी परतला. त्यानंतर सिद्धेशसोबत ऋतुराज गायकवाडने नाबाद शतकी भागीदारी करताना वैयक्तिक दोघांनी अर्धशतकंही पूर्ण केली. तसेच, दोघेही शेवटपर्यंत नाबाद राहिले. ऋतुराज 55 धावांवर, तर सिद्धेश वीर 55 धावांवर नाबाद राहिला. तत्पुर्वी केरळला पहिल्या डावात 63.2 षटकात सर्वबाद 219 धावाच करता आल्या. त्यामुळे महाराष्ट्राला 20 धावांची आघाडी मिळाली. केरळकडून सर्वाधिक धावा संजू सॅमसनने केल्या. त्याने 54 धावांची खेळी केली. सलमान निझारने 49 धावा केल्या, तर कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनने 36 धावा केल्या.







