महाराष्ट्राची तलवारबाजीत पदकांची पंचमी

| मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी फेन्सिंग (तलवारबाजी) या खेळामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाच पदकांची माळ आपल्या गळ्यात घालत ऐतिहासिक प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या खेळात एक रौप्यपदक आणि चार ब्राँझपदकांना गवसणी घातली.

तलवारबाजीतील सेबर सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ब्राँझपदक जिंकले. सेबर सांघिक पुरूषांमध्ये महाराष्ट्राचा सामना उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य जम्मू काश्मीर संघासोबत झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राने (45- 43) अवघ्या दोन गुणांनी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत पंजाब संघासोबत झाली. पंजाब संघााने 45-33 अशा मोठ्या फरकाने महाराष्ट्र संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील पराभवामुळे महाराष्ट्र संघास ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पदक जिंकणार्‍या महाराष्ट्राच्या संघात अभय शिंदे, धनंजय जाधव, श्रीशैल शिंदे व ऋत्विक शिंदे या खेळाडूंचा समावेश होता.

युवा नेमबाज समर्थ मंडलिक आणि रुचिता विनेरकरने महाराष्ट्र संघाला नेमबाजीत तिसरे पदक मिळवून दिले. या दोघांनी एअर पिस्तूल मिश्र गटात ब्राँझपदक आपल्या नावे केले. याआधी रुद्रांश पाटीलने नेमबाजीतील पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ अभिज्ञा पाटीलने ब्राँझपदकावर मोहोर उमटवली. हीच लय कायम ठेवत समर्थ आणि रुचितानेही पदक जिंकले.

Exit mobile version