| पुणे | प्रतिनिधी |
इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राने 6 सुवर्णपदके जिंकत दमदार यश संपादन केले आहे. त्यात ठाण्याच्या हर्ष राऊतने शंभर मीटरची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला. महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत मुळची छत्रपती संभाजीनगरची मात्र, येथे रिलायन्सतर्फे धावणाऱ्या साक्षी चव्हाणने बाजी मारली. तर, महाराष्ट्राच्या काही खेळाडूंनी आर्मी, रिलायन्स, जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधित्व करताना यश संपादन केले. या स्पर्धा शनिवारी (दि.12) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर पार पडल्या.
महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या यजमानपदाखाली संघटनेची राष्ट्रीय पातळीवरील पहिलीच प्रमुख स्पर्धा आहे. त्यात पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत तीन शर्यती झाल्या. निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या हर्ष राऊतने 10.38 सेकंदाची वेळ देत सुवर्णपदक पटकाविले. पुरुष व महिलांच्या 5 हजार मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या धावपटूंनी बाजी मारली. पुरुषांच्या शर्यतीत मृणाल सरोदेने आर्मीच्या धावपटूंचे आव्हान मोडून काढत शर्यत पूर्ण केली. महिलांची शर्यत रविना गायकवाडने 17 मिनीटे 00.98 सेकंदात जिंकली.
पुरुषांच्या भालाफेकीत महाराष्ट्राचाच असलेल्या मात्र आता आर्मीत कार्यरत असलेल्या शिवम लोहकरने 80 मीटरचे अंतर पार करताना सुवर्णपदक पटकाविले. त्याने 80.95 मीटर अंतरावर फेक केली. ऑलिंपियन श्रीशंकर मुरलीने दुखापतीनंतर पुनरागमन करताना 8.05 मीटर अशी प्रभावी कामगिरी केली व प्रथम स्थान पटकाविले. माजी आशियाई रौप्यपदक विजेत्या सर्वेश कुशारेला उंच उडीत आव्हानच नव्हते. त्याने 2.20 मीटर अंतरावर उडी मारली. महाराष्ट्राच्या धैर्यशीलने रौप्यपदक जिंकले. याशिवाय महिलांच्या भालाफेकीत सृष्टी सिंगने सुवर्ण तर पुरुषांच्या गोळाफेकीत राहुल ऐरने रौप्य व ऋषीकेश सहारेने कांस्यपदक जिंकले. महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत प्राची देवकरला रौप्यपदक मिळाले.







