बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक

कठोर कारवाई करण्याची मागणी; अन्यथा चक्काजाम आंदोलन

। उरण । वार्ताहर ।

देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत. महिला कुठेही सुरक्षित नाहीत त्यामुळे महिलांवर सतत होणार्‍या अत्याचारच्या निषेधार्थ व बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे उरण शहरातील बाजारपेठ येथील गांधी चौकात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.

हे सरकार अत्याचार करणारे, अत्याचार करणार्‍याला संरक्षण देणारे सरकार आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामे द्या, आम्ही सरकार चालवितो अशा शब्दात खडसावले. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. बदलापूर येथील झालेला घटनाचा आम्ही सर्व प्रथम महाविकास आघाडीच्यावतीने व विविध संस्था संघटनेच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करतो. दोन दिवसापूर्वीच रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. बहिणीने भावांना राख्या बांधल्या आहेत. या राख्यांचा अर्थ या सरकारला कळत नसेल किंवा त्या नराधमांना कळत नसेल. त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला आम्ही कमी पडणार नाही, असे प्रीतम म्हात्रे म्हणाले.

उरणमधील यशश्री शिंदे निर्घृण हत्या प्रकरणात नराधमाला दोन दिवसात अटक झाली. मात्र पुढे काय झाले याची काहीच माहिती नाही. लवकर निर्णय न घेतल्याने असे वारंवार घटना घडत आहेत. उरणमधील घटना ताजी असतानाच लगेच बदलापूरमध्ये घटना घडली. या राज्यात चालले तरी काय. राख्या कशाला पाहिजेत. राखीचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर असल्या सरकारचे व असे व्यवस्थापनाचे काहीच काम नाही. मग महिलांना सामाजिक संस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल. व्यवस्थापकांना ताब्यात घ्यावे लागेल. आता आम्ही थांबणार नाहीत आम्हाला निर्णय हवेत. आमच्या मुली, आमच्या राख्या सुरक्षित नाही आहेत. आज महिला कुठेही सुरक्षित नाही. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे छोटे व्यावसायिक महिला, शाळेत जाणारे लहान मुली, नोकरदार वर्ग कोणीच सुरक्षित नाही. आजच्या चिमुकल्या मुलींना भीतीपोटी बाहेर कुठेही सायकल चालवता येत नाही. चिमुकल्या मुलीच्या सुरक्षेसाठी त्या लहान मुलीबरोबर आईलाही घराबाहेर पडावे लागत आहे. यासाठी आम्ही हा जन आक्रोश आंदोलन केले आहे. मात्र हे असेच चालू राहिले तर पुढे जाऊन चक्काजाम आंदोलन करावे लागेल, असा आक्रमक शब्दात प्रीतम म्हात्रे यांनी शासनाला इशारा दिला.

Exit mobile version