| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची प्रचार मोहीम सहा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे व आणि मी अशी एकत्रित मोहीम सुरू होईल, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
आज दिवाळी आहे. कटू बोलणे नको, असे म्हणत त्यांनी सिंचन घोटाळाप्रकरणी सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत बोलणे टाळले. मविआचे ज्या मतदारसंघात दोन किंवा अधिक अर्ज दाखल झाले आहेत, त्यासंबंधी बसून आम्ही योग्य तो मार्ग काढू, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही एकत्रित प्रचार मोहीम राबवून लोकांनी पाठिंबा द्यावा, अशी परिस्थिती निर्माण करू. राज्यातील जनता आम्हाला साथ देईल, असे पवार म्हणाले. राज्यातील जनतेला पवार यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, दीपावलीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. एकमेकांशी सुख-दुःखे सांगतात. मला खात्री आहे, महाराष्ट्रातील जनता दीपावलीच्या प्रसंगी समाधान आणि आनंदाने एकत्र येतील. मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. जनतेचा आत्मविश्वास वाढो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.