सुरेंद्र म्हात्रे व राकेश म्हात्रे यांना भरघोस मताधिक्य देण्याचे मतदारांना आवाहन
| चौल | प्रतिनिधी |
चौल जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष-महाविकास आघाडीने प्रचारात निर्णायक आघाडी घेतली असून, नागाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी दि. 29 रोजी नागाव येथील सिद्धीविनायक मंदिरात जिल्हा परिषदेचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे आणि नागाव-रेवदंडा पंचायत समितीचे उमेदवार राकेश वसंत म्हात्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ गणरायाचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला. नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांनी सांगितले की, नागावमध्ये शेतकरी कामगार पक्ष व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून, आजही विकासाचा धडाका सुरू आहे. रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या कामांमुळे नागावची जनता समाधानी आहे. नागावची जनता कायम शेकापच्या पाठीशी उभी राहिली असून येथील मतदार अत्यंत सुज्ञ आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना नागावमधून निश्चितच भरघोस बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, मतदारांनी विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला, अफवांना किंवा अपप्रचाराला बळी न पडता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे. सध्या नागावमध्ये विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार सुरू असून, त्याला योग्य उत्तर मतपेटीतूनच द्यावे, असे आवाहन त्यांनी नागावकर मतदारांना केले.
याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य शरद वरसोलकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, नागाव-रेवदंडा पंचायत समितीचे उमेदवार राकेश वसंत म्हात्रे, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, माजी उपसरपंच संदेश नाईक, राजू मयेकर, मंगेश राणे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश खोत, रेवदंडा शहराध्यक्ष निलेश खोत, सोनाली मोरे, प्रमोद नवखारकर, नागाव ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र नागलेकर यांनी केले.
यावेळी “लाल बावटे की जय”, “शिवसेना जिंदाबाद”, “महाविकास आघाडीचा विजय असो” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर नागावमधील मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचारपत्रकांचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांकडून दोन्ही उमेदवारांना वाढता आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले असून, नागावमध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे.







