भूमीपुत्रांसाठी महाविकास आघाडी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

देशातील मूठभर लोकांच्या हातात सत्ता आणि संपत्ती राहिली पाहिजे, असे भाजपचे राजकारण सुरु आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांसह ज्येष्ठ नेत्यांचे विचार पुसण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने सुरु आहे. आगामी काळात शेतकऱ्यांचे नावही सातबाऱ्यावरून पुसले जाणार आहे. या भागात आता तिसरी मुंबई येऊ घातली आहे. भूमीपुत्रांना देशोधडीला लावण्याचे काम होणार आहे. कोकणातील जमिनी भांडवलदारांच्या घशात घातल्या जाणार आहेत आणि म्हणूनच भूमीपुत्रांच्या हितासाठी महाविकास आघाडीने हा लढा उभारला आहे. भूमीपुत्रांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आघाडी समर्थपणे लढणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप, काँग्रेसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केले.

आवास जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर, आवास पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार नयना शिळदणकर, किहीम पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार अनिता शिंदे यांच्या प्रचारार्थ चोंढी नाका येथे मंगळवारी (दि.3) सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सकपाळ बोलत होते. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, आवास जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर, आवास पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार नयना शिळदनकर, किहीम पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार अनिता शिंदे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुनील थळे, काका ठाकूर, योगेश मगर, अशोक चव्हाण, ॲड. विजय पेढवी, संदीप गायकवाड आदींसह शेकाप, काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व इतर मित्र पक्ष महाविकास आघाडातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले की, भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर गरिबी, बेरोजगारी, दारिद्य्र मोठ्या प्रमाणात होते. पंडित जवाहर लाल नेहरुंसह अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यावेळी शेतकरी, सैनिकांच्या मागे राहण्याची भावना होती. राष्ट्रीय बँकांसह तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरणासह गरिबी हटावसाठी काँग्रेसने प्रयत्न केले. मोबाईलसह संगणकीय राज देशामध्ये निर्माण केले. खुली अर्थव्यवस्था निर्माण केली. आपला माल विदेशात विकण्याची व्यवस्था केली. अर्थव्यवस्थेला एक वेगळा आयाम देण्याचे काम केले. सक्तीच्या शिक्षणासह वनहक्क कायदा, अन्नसुरक्षा कायदा आणला. संविधान व लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली. पंचायत राज प्रणाली आणून जनतेला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न केला. रोजगाराचे दालन खुले व्हावे, म्हणून रोजगार हमी योजना सुुरू केली. मात्र, सध्याच्या पंतप्रधानांना प्रगतीचा कोणताच आयाम नाही. निराशाजनक असा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार मध्यमवर्गासाठी कोणत्याही प्रकारचे तिहि या अर्थसंकल्पात नाही, अशी परिस्थिती आहे.

देशात काला धन आणू, दहशतवाद कमी करू, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करू, अशा घोषणा देत मते मिळविली. परंतु, पेहलगामसह अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कुठून आले याचा थांगपत्ता अजूनही लागला नाही. काला धन देशात आला नाही. शेतकरी आजही आत्महत्या करीत आहेत. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला भाव नाही, अशी परिस्थिती आहे. फक्त भांडवलदारांचा फायदा बघण्याचा प्रयत्न भाजपचे सरकार करीत आहेत. 56 इंच छातीचे पंतप्रधान ट्रम्पसमोर मांजर झाले आहेत. भारताला फसवणारा आणि खोटं बोलणारा हा माणूस आहे. ‌‘हर घर नल’च्या नावाने योजना आणली. मात्र, आजही अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. वेगवेगळ्या महामार्गाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, आजही अनेक गावांतील रस्ते खराब आहेत. याकडे मात्र प्रत्यक्ष दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सकपाळ यांनी केला आहे.

बोथट झालेल्या भावनांचा फायदा भाजप घेत आहे. लाडकी बहीण योजना आणली. परंतु, केवायसी करून लाडक्या बहिणी थकल्या आहेत. त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. आता फक्त ‌‘पैसा फेको तमाशा देखो’ असा प्रकार निवडणुकीच्या काळात भाजप करीत आहे. ‌‘नाच मेरे बुलबूल तुम्हे पैसा मिलेगा’ अशी पध्दत सुरू आहे. त्यामुळे अशा आमिषाला बळी न पडता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन सकपाळ यांनी केले. सध्या अदानी आणि अंबानीला देश विकला जात आहे. नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र, हे विमानतळ अदानीसारखे भांडवलदार चालवित आहे. एन.एम. इंटरनॅशनल नावाने विमानतळ चालविला जात आहे. हे रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करून जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवा, असे हर्षवर्धन सकपाळ म्हणाले.

सकपाळांकडून दळवींना टोला
आरसीएफ कंपनीमध्ये स्थानिकांना घेतले जात नाही. रोजगाराचा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी स्वाभिमान विकून आहेत. आपले काम झाल्यावर ‌‘हम आपके कौन है' या भूमिकेतून ते वागत आहेत, असा टोला नाव न घेता हर्षवर्धन सकपाळ यांनी आमदार दळवी यांना लगावला. तसेच अशा विकृतीला रोखण्यासाठी शेकापसह काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
कोकणकरांनो, सावधान
अदानीने पालघरपासून गोव्यापर्यंत जमिनी घेतल्या आहेत. कोकण विकण्याचा घाट सुरु आहे. अदानीला जमिनी देण्याबरोबरच वेगवेगळ्या खाणी विकल्या जात आहेत. भाजप भांडवलदारासाठी काम करीत आहेत. शक्तीपीठ महामार्ग भांडवलदारांसाठी आणला जात आहे. अदानी म्हणजे आताची ईस्ट इंडिया कंपनी आहे. कच्चा माल बाहेर पाठवून पक्का माल आपल्यालाच विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकणातील शेतकरी, भूमीपुत्र स्वाभिमानी आहेत. संघर्ष त्यांच्या रक्तात आहे. हे टिकवून ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा दुष्काळी भागाची झळ तुम्हालाही लागेल, असे मत सकपाळ यांनी व्यक्त केले.
खटारा पाडण्यासाठी रुपेरी पडद्याची घेतली मदत
अलिबागमध्ये आता वेगवेगळी मंडळी जमिनी घेत आहेत. भविष्यात भूमीपुत्रांच्या पोटावर लाथ मारली जाणार आहे. त्यामुळे जमिनी कोणाला द्यायच्या हा विचार करणे गरजेचे आहे. येथील लोकप्रतिनिधी आत्महत्या, बलात्कारावर बोलण्यास तयार नाही. परंतु, भूमीपुत्रांचा आवाज बनणाऱ्या शेकापला हरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भूमीपुत्रासाठी जेट्टीवर भांडण झाले. स्वाभिमान वाणीने जयंत पाटील झळकले. मात्र, भूमीपुत्रांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाला पाडण्यासाठी शाहरुख खानने थळमध्ये पैसे पाठविले, असा आरोप हर्षवर्धन सकपाळ यांनी केला.
चिऊताईच्या संघर्षाला सलाम
हर्षवर्धन सकपाळ यांनी चिऊताई आणि कावळ्याची गोष्ट सांगत अलिबागचे वास्तव नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, आग लागत असताना चिऊताई चोचीने पाणी आणून विझविण्याचे काम करीत असते. त्यावेळी कावळा त्यांना थट्टेने विचारतो, ‌‘इवलुशा चोचीतून पाणी आणून आग विझणार का?' त्यावेळी चिऊताई म्हणाल्या, ‌‘आग विझेल की नाही, माहीत नाही, पण भविष्यात आग लावणाऱ्यांच्या यादीत राहायचे की आग विझविण्याचे हे मी ठरविणार आहे', अशी गोष्ट सकपाळ यांनी सांगत शेकाप प्रवक्त्या या आग विझविण्याच्या यादीत असणार आहेत. कारण, एक विचार घेऊन संघर्ष करीत जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या चित्रलेखा अर्थात चिऊताई यांनी समाजहिताचा विडा उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या संघर्षाला सलाम, असे गौरवोद्गार सकपाळ यांनी काढले.
Exit mobile version