महाविकास आघाडीतर्फे लखीमपूर घटनेचा निषेध

महाराष्ट्र बंदात सहभागी होणार
। उरण । वार्ताहर ।

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बैठका, नियोजन सुरू असून उरणमध्येही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आ. मनोहर. भोईर यांच्या कार्यालयात संपन्न झाली.

बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी 11 ऑक्टोंबर रोजी राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेतला. तसेच यावेळी उत्तर प्रदेश मधील लखीमपूरला शेतकर्‍यांना चिरडून मारणार्‍या केंद्र सरकार व योगी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत होणार्‍या बंद मध्ये संपूर्ण उरण तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद कडकडीत पाळण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जे डी जोशी, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच समाजवादी पार्टीचे उरण शहराध्यक्ष राशीद ठाकूर यांनी एकत्र येत महाराष्ट्र बंदच्या निर्णयात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version