महाविकास आघाडीने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत

चिपळूण भाजपाचे निवेदन
। चिपळूण । प्रतिनिधी ।
मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवदेन तहसिलदार जयराज सुर्यवंशी यांना नुकतेच देण्यात आले आहे.
या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर 5 रुपये प्रतिलीटर एक्साईज कर 10 रुपये प्रतिलीटर कमी करुन जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकुण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल 6 रुपये व डिझेल 12बारा रुपये स्वस्त झाले आहे.
डिझेल दरवाढ करण्यात आली तेव्हा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर, आघाडी सरकारनेही कर कपात करुन आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तरही आपल्या सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता, हे स्पष्ट होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, भाजपाशासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करुन अधिकची सवलत दिली, पण महाराष्ट्राने दिलेली नसल्याची आठवणही करून देण्यात आली आहे. लर राज्यात डिझेलवर 24 टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लीटर 9 रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागु केलेल्या 3 रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी ते 40 रुपये प्रति लिटर मिळतात, ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
तर यापुढे, राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करुन मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी 5 रुपये तर डिझेलसाठी 10 रुपये सवलत द्यावी. तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोवरील प्रती लीटर 3 रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणार्‍या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी, असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, नगराध्यक्षा व जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा खेराडे, विनोद भोबस्कर, आशिष खातू, नगरसेवक परिमल भोसले, नगरसेविका रसिका देवळेकर, नूपूर बाचिम, दिपा देवळेकर, आशिष जोगळेकर, सतिश मोरे, संतोष मालप, साईनाथ कपडेकर, श्रीराम शिंदे, संदीप सुखदरे, वसंत ताम्हणकर, संदेश भालेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version