आई शितळादेवीचे आशीर्वाद घेत नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात
| चौल | विशेष प्रतिनिधी |
चौल मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा जोरदार आणि निर्धारपूर्ण शंखनाद मंगळवारी (दि. 27) भक्तिभावाच्या वातावरणात करण्यात आला. आई शितळादेवीचे आशीर्वाद घेत नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आई शितळादेवीच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा प्रचार नक्कीच विजयाचा मार्ग दाखवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, महाविकास आघाडीचे चौल जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, चौल-वरंडे पंचायत समितीच्या उमेदवार अनया अमित फुंडे, रेवदंडा-नागाव पंचायत समितीचे उमेदवार राकेश म्हात्रे, शेकाप रेवदंडा शेकापचे शहराध्यक्ष निलेश खोत, अमित फुंडे, सुरेश खोत, चौल माजी सरपंच काशिनाथ घरत, आर. डी. म्हात्रे, राजीव मोरे, मधुकर काटकर, राजेंद्र ठाकूर, विजय ठाकूर, विजय चौलकर, अजित गुरव, निलेश म्हात्रे, मारुती भगत, निलेश गाडे, अशोक नाईक तसेच काँग्रेसचे अशोक अंबुकर, आशिष गोंधळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना द्वारकानाथ नाईक यांनी आई शितळादेवीच्या आशीर्वादाने सुरू झालेला प्रचार निश्चितच आघाडीला विजय मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि एकदिलाने काम करून आघाडीच्या सर्व उमेदवारांना सर्वाधिक मतदान मिळवून देण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. चौल, नागाव आणि रेवदंडा परिसरातील आघाडीचा कार्यकर्ता एकनिष्ठ असून, सर्वाधिक मताधिक्य आपल्यालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी आपल्या भाषणात विरोधी उमेदवारावर जोरदार टीका केली. स्वतःचे घर आणि बंगला तोडण्याची वेळ आली म्हणून शिंदे गटात प्रवेश केल्याची पोलखोल करत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. नागाव ऑफिसजवळील इमारत वाचवण्यासाठी पक्षप्रवेशाचा दस्तुरखुद्द आमदारांचाच दबाव होता, अशी कबुली विरोधी उमेदवाराने दिल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आज सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि आग्रावच्या रस्त्यासाठी पक्षप्रवेश केल्याचा खोटा आव आणला जात आहे. कारण, रस्ता दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला आणि यांनी पक्षप्रवेश आता काही महिन्यांपूर्वी केला. त्यामुळे विकासाच्या नावाखाली कोणाचा विकास सुरू आहे, यांना कोणाचा विकास करायचा आहे, हे जनतेने वेळीच ओळखण्याची गरज आहे.
आग्रावचा रस्ता दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाला होता, तरीही त्या रस्त्याच्या नावावर राजकारण केले जात असल्याचा आरोप सुरेंद्र म्हात्रे यांनी केला. सध्या सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. चौलमधील रस्ते आणि गल्ल्यांचे काँक्रिटीकरण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या पुढाकारातूनच झाले असून, चौल बदलण्याचे काम महाविकास आघाडीनेच केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खोटा प्रचार करणारा हा भस्मासूर असून, त्याचा भस्म करायला वेळ लागणार नाही. मी तर त्याची वाट पाहतोय. सर्व कार्यकर्त्यांनीही सज्ज राहायचे आहे. आजपपासून खऱ्या अर्थाने प्रचाराल सुरुवात करायची आहे. खोटा प्रचार सहन केला जाणार नाही, कोणताही वाद न करता निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. लोकांपर्यंत आपली निशाणी मशाल व खटारा पोहोचवून प्रभावी प्रचार करण्याचे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिले.
आज नागावमध्ये सांगितले जातेय, चौल अख्खं पूर्ण आम्ही सांगितले जातेय, आणि चौलमध्ये सांगितले जातेय नागाव अख्खं आम्ही ताब्यात घेतले आहे. ताब्यात कुठलंच काही घेतले नाही. आज आपल्या समोर जो उमेदवार आहे, त्याने नागाव काय आणि कसा उद्ध्वस्त केला आहे, ते पाहावे, आणि चौलमध्येही वाड्या उद्ध्वस्त करुन सुरुवात केली आहे. त्याने काही लोकांना जसे नागावमध्ये फसवले आहे, तसेच आज चौलमध्ये सुरुवात केली आहे.
चौलमध्ये वाडी आणि घर असलेली वडिलोपार्जित जागा स्वतः विकत घेऊन स्थानिकाचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद केला, आणि विचारायला गेल्यावर दादागिरी करीत विमानाने जा असे सांगत धमकावल्याचा आरोप सुरेंद्र म्होत्र यांनी विरोधी उमेदवारावर केला. चौलमध्ये असली दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. खोटी कामे, कोणावर अन्याय होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही. नागावमध्ये छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करुन जागा बळकावल्या, तसे उद्योग चौलमध्ये करु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आमदार, खासदार, मंत्री आमचे ओळखीचे आहेत, त्यांची भीती सर्वसामान्यांना दाखवून धमकावण्याचा कोणी प्रयत्न केला, तर जशास तसे उत्तर देण्यास मी समर्थ आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. कोणत्याही दबावाला न झुगारता प्रत्येक कार्यकर्त्याने ताकदीने काम करा, उद्याचा विजय आपला आहे, असा विश्वास आणि उत्साह कार्यकर्त्यांच्या मनात भरण्याचे काम सुरेंद्र म्हात्रे यांनी केला.
नागाव आणि चौल या दोन्ही ठिकाणी विरोधी उमेदवाराने दादागिरी, फसवणूक आणि अन्याय केल्याचे आरोप करत, असे प्रकार चौलमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. कोणत्याही दबावाला न जुमानता ताकदीने काम करा, विजय आपलाच आहे, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.
कार्यक्रमाच्या शेवटी “महाविकास आघाडीचा विजय असो”, “लाल बावटा की जय”, “शिवसेना जिंदाबाद” अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून गेला. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.











