| उरण | प्रतिनिधी |
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. घरगुती गॅसने स्वयंपाकघराचे बजेट उद्ध्वस्त केले आहे. दूध, धान्य, भाजीपाला, खाद्यतेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. सोने-चांदी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा श्वास गुदमरू लागला असताना सरकार मात्र सुस्तपणे तमाशा पाहत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्यावतीने उरणमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. महागाईच्या ज्वालामुखीवर सर्वसामान्य जनता होरपळत असताना सरकारला जागे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढून संतप्त निवेदन सादर केले. “ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची आहे,“ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. मनिष पाटील, सभापती महेश म्हात्रे, नगराध्यक्षा भावना घाणेकर, उपसभापती परेश पाटील, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपजिल्हा संघटिका ममता पाटील, नगरसेविका नाहीदा ठाकूर, प्रार्थना म्हात्रे, वंदना पवार, जिप सदस्या प्रेरणा पाटील, पंस सदस्य दीपक भोईर, कमलाकर पाटील, नरेश घरत, अविनाश म्हात्रे, रुपेश पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते







