महाविकास आघाडीचे पारडे जड: आ. जयंत पाटील

। उरण । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीत अनेक प्रचार सभा घेतल्या. राज्यातील जनता आता भाजपवाल्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. दहा वर्षे त्यांनी लावल्या तेवढ्या टोप्या पुर्‍या झाल्या. आता राज्यातील जनता हे सहन करणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे संसदेत जाणार आहेत. उद्याच्या विजयाची माळ उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या गळ्यात पडणार आहे. राहुल गांधी पंतप्रधान झाले, तर मला आनंद होईल. विकास करताना नियोजन पाहिजे. राज्यात महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी उरण येथे संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. उरण नगरपरिषदेच्या तीर्थरुप नानासाहेब धर्माधिकारी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत आ. जयंत पाटील बोलत होते.

शेतकरी कामगार पक्षाचे मार्गदर्शक नेतृत्व लोकनेते दि.बा. पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील, माजी विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दत्ता पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी यशस्वी आंदोलने केली. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाने महत्त्वाचे योगदान आहे. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप, हनुमान कोळीवाडा पुनर्वसन प्रश्‍न मार्गी लावणार आहोत. लोकसभा निवडणुकीत 400 पार म्हणणार्‍या भाजपाला तडीपार करण्यासाठी आता विजयासाठी तुतारी वाजवायची आहे. भाजपाला हात दाखवून मशाल पेटवायची आहे, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले.

उबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर चांगलेच टीकेचे आसूड ओढले. दक्षिणेकडील राज्यांनी ठरवले आहे की भाजपला डोक्यावर बसवायचे नाही. उत्तर भारतातही बदल, परिवर्तनाचे वारे वाहात आहेत. महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे अब की बार 400 पारची घोषणा करणारे भाजप चंद्रावरून की अमेरिकेतून कुठून 400 पार करणार, असा रोखठोक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध भारत अशी लढाई आहे. संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. देश, महाराष्ट्र विरोधी भाजप आहे. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात केंद्र सरकारचे अत्याचार वाढतच चालले आहेत. भाजपचे प्रज्वल रेवण्णा यांनी घरातील आणि पक्षातील हजारो महिलांचा अमानुषपणे छळ करुन बलात्कार केला. अशा रेवण्णाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. मतदान झाल्यानंतर त्याला विदेशात पळून जाण्यासाठीही त्यांनी मदत केली असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला.

2022 मध्ये गद्दारी, पक्ष फोडाफोडी करण्याच्या भाजपच्या गलिच्छ राजकारणाविरोधात लढत आहोत. गद्दारीने राज्याच्या सत्तेवर आलेल्यांमध्ये काही मंत्री भ्रष्टाचारांनी बरबरटले आहेत. उत्तर प्रदेशातही महाराष्ट्राप्रमाणेच पलटीराम निघाले आहेत. 370 कलम रद्द करुनही काश्मीरमधील ना दहशतवाद संपला, ना पंडितांना चांगले दिवस आले, ना भरभराट झाली. आज तिथे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे मात्र भाजपला निवडणुकीत उमेदवारही मिळाले नाहीत. लडाखला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला.

दोन वर्षे भाजप सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे. कधी पाहिले आहे का नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाजपने दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करताना. तसेच संभाजी नगरला विमानतळाला उध्दव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव केला होता. मात्र, अडीच वर्षे झाली भाजप सरकारने नाव दिले नाही. याच्याही पलिकडे जाऊन पाहिले तर गोव्यामध्ये एअर पोर्टला मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले आहे. अयोध्येतील एअरपोर्टचे नाव वाल्मिकी एअरपोर्ट केले आहे. आमचा काही आक्षेप नाही. मात्र, उत्तर प्रदेश, गोवा येथील विमानतळाचे नाव बदलले आहे. तर मग महाराष्ट्राने काय चुक केली आहे. नवीमुंबई विमानतळाला तुम्ही दि.बा. पाटील यांचे नाव का देत नाहीत. संभाजीनगरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज नाव का देत नाही. अशा महाराष्ट्र व्देषी भाजपाला या महाराष्ट्र व्देषी मिंधे सरकारला तुम्ही मतदान करणार का हेच नाही तर आपले उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार बदलायचे आहे. महाराष्टातील तरुणांचा हक्काचा रोजगार तुम्ही गुजरातला नेणार तर आम्ही तुम्हाला नडणारच. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन महाराष्ट्राचा, देशाचा अंधकार दूर करून टाका असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. जनतेसाठी संघर्ष केला.

यावेळी माजी खासदार अनंत गीते, जितेंद्र आव्हाड, बबन पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, जेएनपीए कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, नरेश रहाळकर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मिलिंद पाडगावकर, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण उत्कर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत पाटील, भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version