आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरण जनमित्रास कोनगाव शाखा कार्यालयात येऊन मारहाण करणाऱ्या चार आरोपींवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोनगाव शाखा कार्यालयात कार्यरत जनमित्र आशिष जाऊळकर हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्तव्यावर हजर असताना आरोपी अजय नाईक याने जाऊळकर यांना फोन करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काय उपाययोजना केली याची विचारणा केली, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन नंबर मागितला. काही वेळातच आरोपी अजय नाईक, टोनी सिंग, प्रमोद लाड, संदीप सोनकांबळे हे कोनगाव शाखा कार्यालयात आले आणि जाऊळकर यांना शिवीगाळ करून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. तेथे असलेल्या यंत्र चालक आणि सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी केली. जाताना पोलीस तक्रार केली तर काम करू देणार नाही, अशी धमकी दिली. अखेर आशिष जाऊळकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती महावितरणचे कोकण प्रादेशिक कल्याण कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.







