| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
तालुक्यातील गोठावडे, चिवे, वाघोशी आणि वावे या ग्रामीण भागांतील धोकादायक व जर्जर अवस्थेतील विद्युत पोल अखेर महावितरणकडून बदलण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारी व मागणीनंतर महावितरण सुधागड विभागाचे अधिकारी बालाजी चात्रे यांच्या पुढाकाराने ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या भागातील अनेक पोल विजेचा मोठा धोका निर्माण करत होते. काही पोल तिरके झाले होते, काहींची संरचना नाजूक झाल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता होती. यामुळे परिसरातील नागरिक तसेच शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला होता आणि विद्युत पुरवठाही वारंवार खंडित होत होता. बालाजी चात्रे यांनी सांगितले की, “सुधागड तालुक्यातील सुरक्षित विद्युत वितरण ही आमची प्राथमिकता आहे. नागरिकांच्या सूचनांना गांभीर्याने घेऊन आम्ही लगेच संबंधित गावांमध्ये तपासणी केली. त्यामुळे ही धोकादायक पोल त्वरित बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.” महावितरणच्या या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत व सुरक्षित होणार असून, भविष्यातील अपघात टाळण्यास मदत होईल. यासोबतच इतर गावांमध्येही अशीच तपासणी करून आवश्यकतेनुसार पोल बदलण्यात येतील, अशी माहिती अधिकारी बालाजी चात्रे यांनी दिली.
महावितरणने बदलले धोकादायक विद्युत पोल
