उरणमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार; लोकप्रतिनिधी मात्र गप्प

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात महावितरणच्या नियोजनशून्य आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. उरण शहरासह तालुक्यातील कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, पिरकोण, सारडे, वशेणी, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीसह चाणजे, नवघर, जासई आणि चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रात्री-अपरात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या लपंडावामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात काढावी लागत असून, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार आहे. पिण्याच्या पाण्यापासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासापर्यंत, लघुउद्योगांपासून व्यापारी व्यवहारांपर्यंत सर्वच क्षेत्रांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, अनेक भागांत उच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, एसी, इन्व्हर्टर, पंखे, पाण्याच्या मोटारी, संगणक आणि इतर महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. लाखो रुपयांचे नुकसान सहन करणाऱ्या नागरिकांना नुकसानभरपाई कोण देणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे दर्जाहीन वीजपुरवठा, तर दुसरीकडे भरमसाठ वीजबिले, या दुहेरी संकटात उरणकर सापडले आहेत. वीजपुरवठा सतत खंडित होत असतानाही महावितरणकडून मात्र अव्वाच्या सव्वा बिले पाठविली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “वीज नाही, पण बिल मात्र वेळेवर” अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, उरण तालुक्यातील वीज समस्येबाबत पनवेल येथे झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्या बैठकीनंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याने महावितरणच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Exit mobile version