पूरात महावितरणच्या ‌‘प्रकाशदूतांची’ धडाडी

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

मुसळधार पाऊस, पुराचे पाणी आणि जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने काम करत जिल्ह्यातील साई शाखेअंतर्गत येणाऱ्या रावे, केळवणे, दिघाटी आणि कासारभाट परिसरातील सुमारे 9,500 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला.

6 जुलै रोजी पाताळगंगा नदीलगतच्या सीमा खाडी परिसरात 22 केव्ही उच्चदाब वाहिनीचा जंप कट झाला, तर रावे गावाजवळील काही वीज खांब कोसळल्याने चार गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. पुराच्या पाण्यामुळे रस्ते बंद असूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बोटीच्या साहाय्याने घटनास्थळी पोहोचत मुख्य बिघाड शोधून काढला. कमरे एवढ्या पाण्यात आणि अंधारात काम करून केळवणे, दिघाटी व कासारभट येथील सुमारे 5,500 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

रावे गावातील परिस्थिती अधिक गंभीर असल्याने पाणी ओसरल्यानंतर 9 जुलै रोजी तीन नवीन वीज खांब उभारून तीन रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर 10 जुलैपर्यंत उर्वरित दुरुस्ती पूर्ण करून सर्व 9,500 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या मोहिमेवर भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील, अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख, उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय सांगळे यांनी सातत्याने देखरेख ठेवली. कनिष्ठ अभियंता राकेश गोलवड, साई शाखेचे कर्मचारी आणि रावे ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे आव्हानात्मक काम अल्पावधीत पूर्ण झाल्याचे महावितरणने सांगितले.

Exit mobile version