सेक्टर 13 मधील ए टाईप परिसरातील रहिवासी त्रस्त
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल सेक्टर 13 मधील ए टाईप परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. दररोज सकाळी सुमारे 6.30 वाजता, तसेच अनेकदा सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, याच वेळेत सिडकोकडून परिसरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याने नागरिकांसमोर वीज आणि पाणी अशा दोन्ही मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार वीजखंडित होत असल्याबाबत रहिवाशांनी महावितरणच्या वायरमनकडे विचारणा केली असता, ट्रान्सफॉर्मरपासून ए टाईप परिसरापर्यंतची मुख्य केबल जुनी झाली असून ती वारंवार जळत असल्याचे सांगण्यात आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही जुनी केबल बदलून नवीन मुख्य केबल टाकणे आवश्यक असल्याची माहितीही देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाल्याने घरातील दैनंदिन कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच पाणी भरण्याच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. एकीकडे नियमित वीजबिले भरावी लागत असताना दुसरीकडे सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मरपासून ए टाईप परिसरापर्यंतची जुनी मुख्य केबल तातडीने बदलून कायमस्वरूपी वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, वीजखंडित होण्याचा सिलसिला कधी थांबणार आणि समस्या कायमस्वरूपी कधी सुटणार? असा सवाल आता सेक्टर 13 मधील ए टाईप परिसरातील रहिवासी उपस्थित करीत आहेत.






