महावितरणची मागेल त्याला वीज मोहीम

24 तासात 11 वीजजोडणी

| रायगड | खास प्रतिनिधी |

नवीन वीज जोडणी घेऊन इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात 24 तासात, तर ग्रामीण भागात 48 तासात वीजजोडणी देण्याची महावितरणची मोहीम राज्यभर सुरु आहे. त्यानुसार अलिबाग येथील नागाव आणि चौल येथे 24 तासांत 11 नवीन वीजजोडणी देण्यात आली.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश सर्व परिमंडलांना दिले होते. या कामाबाबत मुख्य अभियंता सुनील काकडे प्रत्येक मंडळाचा दररोज आढावा घेत आहेत. त्यानुसार, महावितरण अलिबाग येथील नागाव शाखेत 11 अर्जदारांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून 24 तासांच्या आत वीजजोडण्या देण्यात आल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवीन वीज जोडणीच्या कामाला वेग देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे, वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी 24 तासांच्या आत वीजजोडणी देण्याचे प्रयत्न कर्मचारी करत आहेत. ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्याकडून आवश्यक शुल्क भरून घेतल्यानंतर काही तासातच 11 नवीन वीज जोडणी देण्याचे उपक्रम महावितरणच्या भांडूप परिमंडलातील नागाव शाखेने केले आहे.

अलिबाग कार्यकारी अभियंता शैलेश कुमार व अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून 24 तासांच्या आत ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या. याबाबत, पेण अधीक्षक अभियंता इब्राहीम मुलाणी यांनी त्यांचे कौतुक केले. अर्ज केल्यानंतर तातडीने वीज जोडणी मिळाल्याबद्दल ग्राहकांनी महावितरणच्या नागाव शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Exit mobile version