विजेची वाढती मागणी; 1000 मेगावॉट हरित ऊर्जा खरेदी करणार
। रायगड । प्रतिनिधी ।
विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरण मिशन ग्रीन एनर्जी अंतर्गत तब्बल 1 हजार मेगावॉट वीज सौरऊर्जा प्रकल्पातून खरेदी करणार आहे. त्यासाठी कंपनीने खुल्या निविदा मागवल्या असून पुढील दोन वर्षांत सौर प्रकल्प उभारून वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे.
महावितरणचे सध्या जवळपास 35 हजार मेगावॉटहून अधिक क्षमतेचे वीज खरेदी करार आहेत; मात्र त्यामध्ये औष्णिक वीज प्रकल्पांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, अनेकदा कोळसाटंचाईमुळे पुरेशी वीज उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतात. त्यातच अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे खुल्या बाजारातून महागडी वीज खरेदी करण्यापेक्षा वीज खरेदी कराराच्या माध्यमातून पुढील 20 वर्षांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उपलब्ध व्हावी, म्हणून खुली निविदा मागविण्यात आली आहे. यामध्ये पात्र वीज कंपनीला देशात कुठेही वीज प्रकल्प उभारता येणार आहे.
प्रतियुनिट विजेचा दर तीन रुपयांच्या घरात महावितरण दीर्घकालीन खरेदी कराराच्या माध्यमातून वीज घेणार आहे. त्यामुळे विजेची किंमत ई-रिव्हर्स बिडिंगद्वारे निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, या नियोजित वीज प्रकल्पात तयार होणार्या प्रतियुनिट विजेचा दर 2.90 रुपये ते 3.40 रुपयांपेक्षा जास्त असू नये, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे परवडणार्या दरात महावितरणला आणि पर्यायाने ग्राहकांना उपलब्ध होऊ शकणार आहे.