रायगड काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी उरणचे महेंद्र तुकाराम घरत यांची निवड

स्व.मधुशेठ ठाकूर यांचे पुत्र ऍड.प्रवीण ठाकूर यांची प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्हा काँग्र्रेस अध्यक्षपदी उरण येथील कामगार नेते महेंद्र घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आक्रमक नेतृत्व असणार्‍या महेंद्र घरत यांच्या रुपाने माणिकराव जगताप यांच्या नंतर पुन्हा एकदा चांगले नेतृत्व लाभले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्ते यासह अनेक नवे पदाधिकारी या कार्यकारिणीत जाहीर करण्यात आले आहेत. रायगड मधून स्व.मधुशेठ ठाकूर यांचे पुत्र अ‍ॅड.प्रवीण मधुकर ठाकूर व स्व.माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांची प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून रायगड काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उरणचे महेंद्र तुकाराम घरत यांची निवड करण्यात आली आहे. पेणचे चंद्रकांत पाटील व नंदा राजेंद्र म्हात्रे यांची महासचिव म्हणूनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धनंजय देशमुख, मोईन शेख व असिफ तवक्कल यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षांच्या यादीत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव समावेश आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी चालवतील हे स्पष्ट आहे.
शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती मात्र ना त्यांनी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारलं ना मंत्रीपद.. काँग्रेस कार्यशैली बाबत सोनिया गांधींना पत्र लिहिणार्या 23 जणांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. आता त्यांच्याकडे राज्यात शिस्तपालन कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आला आहे. तर अमरजित मनहास यांच्याकडे खजिनदार पद देण्यात आलं आहे.
कार्यकारणी सोबतच 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीदेखील काँग्रेसने जाहीर केलेल्या आहेत. धवलसिंह मोहिते पाटील सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तर विक्रम सिंह सावंत सांगली ग्रामीणचे अध्यक्ष तर महेंद्र तुकाराम घरत हे रायगडचे अध्यक्ष असणार आहेत. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप व काँग्रेसचे अलिबागचे माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. जिल्हा काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण, याची चर्चा सुरू असतानाच तब्बल महिनाभरानंतर अध्यक्ष निवडण्यात आले आहे. नवनियुक्त अध्यक्ष उरणचे महेंद्र घरत हे कामगार नेते असून, धडाकेबाज स्वभाव अशी त्यांची ओळख आहे. संघटन कौशल्य ही त्यांची भक्कम बाजू मानली जाते.

Exit mobile version