मैफिल अलिबाग आयोजित वार्षिक संगीत महोत्सव

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे येथील आरसीएफ वसाहतीमध्ये दि. ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या महोत्सवात डॉ. दिलीप गायतोंडे यांचे संवादिनी वादन, ग्वाल्हेर गायकीचे अध्वर्यू पद्मश्री पं. वेंकटेश कुमार यांचे गायन आणि रसिकमान्य कलाकार सत्यजित प्रभू, विभावरी आपटे, हृषीकेश रानडे, श्रुति बुजरबरूवा व सहकलाकार यांचा रागदारीवर आधारीत हिन्दी मराठी सिनेगीतांचा कार्यक्रम सादर होत आहे.

मैफिल अलिबाग ही संस्था अलिबाग परिसरात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ संगीताचे देखणे कार्यक्रम आयोजित करणारी संस्था म्हणून परिचित आहे. अलिबागसह रोहा, पेण, मुरुड, रेवदंडा तालुकापर्यंत सभासद वर्गाचे क्षेत्र पसरलेली ही संस्था गेली तीस वर्षे सातत्याने अभिजात संगीताचे कार्यक्रम आयोजित करीत आहे. दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारीत दोन दिवसीय संगीत महोत्सव, जुलै – ऑगस्ट मध्ये एक कार्यक्रम आणि कोजागरीचा कार्यक्रम याप्रमाणे संस्थेच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक असते.



यावर्षीचा संगीत महोत्सव दि ११. आणि १२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. ११ संध्याकाळी ७.०० वाजता डॉ. दिलीप गायतोंडे यांच्या संवादिनी वादनाने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. त्यांना तबला साथ सुनील जायफळकर यांची असेल. विख्यात तबला गुरु भाई गायतोंडे यांचे सुपुत्र असलेले डॉ. दिलीप गायतोंडे वैद्यकीय व्यावसायिक असून एक उत्तम संवादिनी वादक म्हणून ते परिचित आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता पद्मश्री पं. वेंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याच्या सौंदर्यपूर्ण मिलाफाचा अलौकिक आनंद पंडिताजींच्या गायनात श्रोत्यांना मिळतो. त्यांना या कार्यक्रमात तबला साथ विख्यात तबलावादक भरत कामत तर संवादिनी साथ सुयोग कुंडलकर करणार आहेत. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी प्रतिलता समजली जाणारी विभावरी आपटे, सुरेल गायक हृषीकेश रानडे आणि युवा गायिका श्रुति बुजरबरूवा रागदारीवर आधारित लोकप्रिय हिन्दी मराठी सिने-भावगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. विख्यात संगीत संयोजक सत्यजित प्रभू यांच्या संकल्पनेतून सादर होत असलेल्या या कार्यक्रमात सत्यजित प्रभू यांसह अर्चिस लेले, झंकार कानडे, संजय महाडीक, प्रभाकर मोसमकर, भिसाजी तावडे असा तगडा वाद्यवृंद असणार आहे. तर सुविख्यात सुसंवादक मिलिंद कुलकर्णी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ इछिणार्‍या संगीत रसिकांनी उदय जोशी 9921924500 किंवा उदय शेवडे 9987768748 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version