आदित्य मोडक यांचे उद्या सुश्राव्य गायन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मैफिल अलिबागतर्फे कोजागरीच्या निमित्ताने शनिवारी 8 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता आरसीएफ च्या कुरुळ वसाहतीमध्ये विख्यात गायक आदित्य मोडक यांचा उपशास्त्रीय, नाती आणि भक्तिगीत गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी कोजागरी पौर्णिमेच्या दरम्यान वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची परंपरा याही वर्षी कायम ठेवत संस्थेने आदित्य मोडक या आश्वासक युवा कलाकाराची सांगीतिक मैफिल आयोजित केली आहे.
नुकत्याच झालेल्या व्हीनस येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट स्क्रीन प्ले पुरस्कार मिळविलेल्या चैतन्य ताम्हाणे यांच्या द डिसायपल चित्रपटातील नायकाच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेला आदित्य मोडक हा मुळात उत्कृष्ट गायक आहे. ग्वाल्हेर गायकीचे सध्याच्या काळातील अध्वर्यू मानले जाणारे पं डॉ राम देशपांडे यांच्याकडे आदित्य मोडक शास्त्रशुद्ध गायकीचे धडे घेत आहे. गायनाचे प्राथमिक शिक्षण त्याने चंद्रकांत पारकर व प्रदीप धोंड यांच्याकडून बालपणापासून घेतले आहे. गांधर्व महाविद्यालय मिरज येथून विशेष योग्यतेसह संगीत विशारद तर प्रथम श्रेणीत संगीत अलंकार पदवी प्राप्त केली आहे. त्याची शैक्षणिक पार्श्वभूमीदेखील तितकीच उल्लेखनीय आहे. वाणिज्य शाखेचा स्नातक असलेला आदित्य लेखा परीक्षकाची (सीए)ची अवघड परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाला होता. मात्र गाण्यावरील प्रेमापोटी प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपनीतील वित्त विभागातील उच्च पदावरील नोकरी सोडून तो आता पूर्णपणे गायनासाठी वेळ देत आहे. शास्त्रीय गायनासाठीचे विष्णु दिगंबर पलुस्कर पुरस्कार, युत फेस्टिवल मधील तीन सुवर्णपदके, सवाई गंधर्व शिष्यवृत्ती सारखे प्रतिष्ठित पुरस्कार गाठीशी असलेल्या आदित्यने देशभरातील बहुसंख्य नामांकित सगीत महोत्सवात आपले गायन सादर करून जाणकारांची वाहवा मिळविली आहे.
ग्वाल्हेर गायकीचा हा युवा आश्वासक कलाकार मैफिलच्या कोजागरी विशेष कार्यक्रमात उपशास्त्रीय गायना सोबत लोकप्रिय नाट्यगीते आणि अभंगरचना सादर करणार आहे. या कार्यक्रमात त्याला संवादिनीवर सुधांशु घारपुरे व तबल्यावर विनय मुंढे हे गुणी कलाकार साथ संगत करणार आहेत. अलिबाग येथील रायझिंग फॅसिलिटी मॅनेजमेंट या सुविख्यात हाऊस किपिंग व्यवसायाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद अलिबाग परिसरातील संगीतप्रेमी रसिकांनी घेऊन कोजागरी पौर्णिमेचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.