स्मशान, दफनभूमीसाठी जागा कायम ठेवा; घोटवडे येथील ग्रामस्थांची मागणी

अलिबागच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडून आश्‍वासन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील घोटवडे गावालगतच स्मशान व दफनभूमी गेल्या अनेक वर्षापासून आहे. मात्र याच जागेवर शासकिय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांची जागा बळकाविण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. स्मशान व दफनभूमीची जागा कायम ठेवा अशी मागणी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीला दुजोरा देत अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्‍वासन मंगळवारी दिले.

घोटवडे गावालगत एक मोकळी जागा आहे. या जागेचा वापर क्रिकेटसाठी केला जात होता. शनिवार, रविवारी क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या जात होत्या. स्थानिकांना खेळाचे व्यासपिठ या मैदानातून उपलब्ध झाले होते. या मैदानाला लागूनच घोटवडे गावालगतच पूर्वपरंपरागत स्मशानभूमी व दफनभूमी आहे. याच मैदानाच्यापलिकडे शेकडो एकर जमीन आहे. त्यामुळे या जागेतूनच शेताकडे जाण्याचा रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून वहिवाटीचा हा रस्ता आहे.
घोटवडे येथील स्मशानभूमी व दफनभूमीला लागूनच असलेल्या सरकारी गुरचरण जागेमध्ये शासकिय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला.

सुमारे 52 हजार एकर क्षेत्रामध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, कर्मचारी वसाहत, वसतीगृह अशा अनेक सुविधा असणार आहेत. या प्रकल्पाचे ग्रामस्थांसह अनेकांनी स्वागतच केले. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु शेतीकडे जाणारा वहिवाटीचा मार्ग तसेच परंपरागत असलेली दफन व स्मशानभूमीची जागादेखील बळकाविण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. या जागेवर पत्र्याचे कुंपण घालून येण्याजाण्याचा मार्ग बंद करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयासाठी दफन व स्मशानभूमीची जागा घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याने घोटवडे येथील ग्रामस्थांनी विरोध केला. स्मशानभूमी व दफनभूमीची जागा कायम ठेवा अशी मागणी करीत तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यास सुरुवात केली. अखेर मंगळवारी अलिबाचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी जागेची पाहणी करीत ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर तुमची मागणी रास्त आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मांडून यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. मेडिकल कॉलेजचा नकाशा पाहून त्यावर योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन दिले. आवश्यक वाटल्यास जिल्हाधिकारी यांच्या समवेत शिष्टमंडळाची बैठक बोलावली जाईल, असे ही त्यांनी सांगितले. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. या मागणीबाबत योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

मुकेश चव्हाण
उपविभागीय अधिकारी, अलिबाग

मेडिकल कॉलेजला विरोध नाही. परंतु आमची स्मशानभूमी व दफनभूमीची परंपरागत असलेली जागा आम्हाला मिळावी ही आमची मागणी आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा. उपविभागीय अधिकारी यांनी जागेची पाहणी केली. ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. त्यांनीदेखील न्याय देण्याचा आश्‍वासन दिले आहे.

नारायण थळे
घोटवडे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार्‍या जागेतून शेताकडे जाण्याचा मार्ग आहे. या जागेच्या पलिकडे शेती आहे. भात, कडधान्य, आंबा अशा अनेक पिकांची लागवड केली जाते. मात्र प्रकल्पाच्या नावाने शेताकडे जाण्याचा मार्गच बंद केला आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होऊ लागली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वहिवाटीचा मार्ग खुला करावा अशी मागणी आहे.

भालचंद्र शिंदे
उसर

Exit mobile version