आश्वासनाची पूर्तता करण्यास प्रशासन उदासीन
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील घोटवडे गावालगतच असलेली स्मशानभूमी व दफनभूमी तोडून अन्य ठिकाणी बांधण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी सामंजस्यपणाने त्याचा स्वीकार केला. परंतु, नव्याने बांधण्यात आलेली स्मशानभूमी व दफनभूमी अपूर्णावस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. पाण्यासह विद्युत सेवा व इतर सुविधा नसल्याने प्रचंड गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे. घोटवडे स्मशानभूमीची वाट बिकट असून, आश्वासनांची पूर्तता करण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे.
घोटवडे येथील परंपरागत असलेली दफन व स्मशानभूमीची जागा बळविण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी दफन व स्मशानभूमीची जागा घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याने घोटवडे ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता. परंतु, घोटवडे ग्रामस्थांनी सामंजस्य भूमिका घेत प्रशासनाच्या आश्वासनानंतर अन्य ठिकाणी स्मशानभूमी बांधण्यास होकार दिला. त्यानुसार पूर्व परंपरागत जागेत असलेली स्मशानभूमी व दफनभूमी अन्य ठिकाणी बांधण्यात आली. परंतु, याकडे जाणारी वाट बिकट झाल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे स्मशानभूमीचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मागील महिन्यात मृतदेह स्मशानभूमीकडे नेताना चिखलातून वाट काढावी लागली. त्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास झाला. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाटेच्या दुतर्फा फक्त पत्रा बसविण्यात आला आहे. पावसात हा पत्रा निघाला होता. त्यामुळे खूप अडचण निर्माण झाली होती. पाणी व विद्युत सुविधा नसल्याने गैरसोय झाली. प्रशासनाकडून फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्मशानभूमीचे काम योग्य केले नाही, रस्ता, पाणी, संरक्षित भिंतीचे काम केले नाही, तर तीव्र आंदोलन करणार, अशा इशारा ग्रामस्थांनी दिला.
घोटवडे येथील नव्या स्मशानभूमीच्या ठिकाणी कंपाऊंड वॉल बांधणार, पाणी, रस्ता अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देणार, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. जोपर्यंत नवीन स्मशानभूमी पूर्ण होत नाही, तोपर्यंत जुनी स्मशानभूमी मोडायची नव्हती. नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. स्मशानभूमीची वाट बिकट आहे. याबाबत तेथील एका असिस्टंट जनरल मॅनेजरला विचारणा केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
प्रसाद शिंदे,
ग्रामस्थ
उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, रेवदंड्याचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत स्मशानभूमीच्या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. पूर्वीची स्मशानभूमी तोडायची असेल, तर नवीन बांधून द्या, असे ठरले होते. परंतु, नवीन स्मशानभूमी पूर्णतः अपूर्णावस्थेत आहे. पावसाळ्यात खूप त्रास होतो. मृतदेह स्मशानभूमीकडे नेताना अडचण निर्माण होत आहे. रस्ता नाही. वारंवार कंपनीला सांगूनदेखील दुर्लक्ष केले जात आहे.
प्रभाकर खंडागळे,
ग्रामस्थ







