धान देण्याचा जुना नियम कायम करा

माजी आ. पंडित पाटील यांची मागणी


| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये भात खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. केंद्रात भात खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. प्रति एकरी 14 क्वींटल धान देण्याऐवजी सरकारने 10 क्वींटल देण्याचा नियम काढला आहे. मात्र सरकारने यंदा धान देण्याच्या नियमात बदल केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे धान देण्याचा जूनाच नियम कायम करावा अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.

कोकणात विशेष करून रायगड जिल्ह्यात भाताबरोबरच आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक आहे. शेतकऱ्यांची व्यापारी पिळवणूक करीत होते. कामगार मिळत नसल्याने शेती ओसाड पडण्याच्या मार्गावर होती. परंतु सरकारने हमी भाव देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे अनेकजण शेतीकडे वळू लागले आहेत.
रायगड जिल्ह्यात 38 भात खरेदी केंद्र आहेत. आतापर्यंत आठ हजार 329 क्विंटल भात खरेदी झाले आहे. 650 शेतकऱ्यांनी आपले भात केंद्रात दिले आहे. यंदा प्रति क्विंटल दोन हजार 83 रुपये हमी भाव दिला जाणार आहे. गतवर्षीच्या तुलनेने हमी भावात 143 रुपयांनी वाढ झाली आहे. परंतु यंदा 10 क्विंटल प्रति एकरी भात देण्याचा नियम लागू केला आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची भीती माजी आ. पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याच्या जाहीरातबाजी करणारे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. सरकारने 14 क्विंटल एकरी धान देेण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

Exit mobile version