शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
रोहा-अष्टमी नगरपरिषदेचे दुर्लक्ष
। रोहा । प्रतिनिधी ।
संपूर्ण देशात वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये वायू, जल, पृथ्वी, अग्नी व आकाश या पाच गोष्टींचा समावेश आहे. पण, रोहा शहर व तालुक्यातील भंगार व्यावसायिक मात्र या अभियानाला गालबोट लावत असल्याचे दिसून येत आहे.
कुंडलिका नदीकिनारी असलेल्या भंगार व्यावसायिकांना प्रचंड जनविरोधानंतर अखेर आपले बस्तान तेथून हलवावे लागले होते. त्यानंतर हे सर्व व्यावसायिक रोहा नगर परिषद हद्दीमध्येच अष्टमी, कृषी बाजार समिती, खारी चेक पोस्ट भागात खासगी जागांमध्ये भाडेतत्त्वावर स्थलांतरीत झाले. मात्र येथे आल्यानंतर ही कुंडलिका पात्रालगत त्यांच्याकडून प्रदूषण नियमांना फासण्यात येणारी हरताळ सुरु असून, सामाजिक आरोग्य आजही धोक्यात असल्याचे दिसत आहे. औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त, लोखंडी व प्लास्टिक साधनांची दिवसरात्र जाळपोळ करून त्यातून त्यांना आवश्यक तो माल काढण्यात येतो. मात्र असे करताना मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त धुर निर्माण होत असल्याने हा संपूर्ण भाग प्रदूषित होत आहे. यामुळे अष्टमी, रेल्वे वसाहत व डॉ. सी.डी. देशमुख कॉलेज लगतच्या नवीन वसाहतीमधील नागरिकांना या सर्व मानवी प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या या सर्व भंगार व्यावसायिकांवर रोहा अष्टमी नगरपरिषद कारवाई कधी करणार, असा सवाल येथील वाढत्या प्रदूषणामुळे त्रस्त नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण सुरक्षा नियमांचे अंतर्गत नागरी वस्तीमध्ये कोणताही कचरा व अन्य वस्तू जाळु नये असे नियम आहेत. जर या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई करण्याचा अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आला आहे. असे असतानाही हे सर्व भंगार व्यावसायिक राजरोसपणे हे सर्व विषारी पदार्थ जाळून प्रदूषण करत आहेत. मात्र, आजपर्यंत त्यांच्यावर कोणत्याही कारवाई होताना दिसत नाही. या प्रदूषणकारी व सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्या भंगार व्यावसायिकांवर रोहा नगरपरिषद प्रशासन कधी कारवाई करेल याकडे येथील सर्व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.







