समृद्धी महामार्गावर ठाण्याजवळ मोठी दुर्घटना; 15 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

। ठाणे । वृत्तसंस्था ।

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळून 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी आहेत. रात्रीच्या वेळी सुद्धा समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडल्याचे समजते. सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांवर कोसळला. आतापर्यंत 15 मृतदेह शहापूर उप जिल्हा रुग्णालयात आणले असुन तीन ते चार जखमींवर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत हे सांगता येऊ शकत नाही.

समृद्धी महामार्गावरील दुर्घटना आणि अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेतून सावरत नाही तोच पुन्हा समृद्धी महामार्गावर शहापूर-ठाणे येथे ही मोठी दुर्घटना घडली आहे.

Exit mobile version