| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी होते. त्यामुळे या घटनेत जीवितहानी होण्याची भीती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. मात्र, समुद्रात गेल्यानंतर बोट अचानक बुडाली. जेओसी येथून प्राप्त माहितीनुसार एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू असल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली, याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, ही बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आजुबाजूच्या बोटींनी तात्काळ घटनास्थळी जात बचावकार्य सुरु केले. ताज्या माहितीनुसार, नीलकमल बोट ही समुद्रात पूर्णपणे बुडाली आहे. आता प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.