संतोष जाधव यांच्या तत्परतेचे कौतुक
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील वाहतुकीस अडचणी निर्माण करणारी वस्तू लोकल गाडीचे ट्रेन मॅनेजर संतोष जाधव यांच्या लक्षात आली. जाधव यांनी तात्काळ समयसूचकता दाखवून याबाबतची माहिती स्थानक प्रबंधकांना दिली. त्यामुळे मध्य रेल्वेवरील मोठा अनर्थ टळला आहे.
नेरळ येथील रहिवाशी असलेले संतोष जाधव हे ट्रेन मॅनेजर म्हणून काम पाहत होते. उल्हासनगर ते अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर रेल्वे रुळावर लोखंडाचा मोठा चौकोनी बॉक्स पडल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कर्जत लोकलचे ट्रेन मॅनेजर (गार्ड) संतोष जाधव यांच्या समयसूचकतेमुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत डाऊन लोकल उल्हासनगर स्थानकातून सुटल्यानंतर उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान ट्रेन मॅनेजर संतोष जाधव यांना गाडीमध्ये अचानक तीव्र झटका जाणवला आणि मोठा आवाज आला. त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी लगेच इंटरकॉमद्वारे मोटरमनला याची सूचना दिली. गाडी थांबल्यानंतर ट्रेन मॅनेजर संतोष जाधव यांनी खाली उतरून पाहणी केली असता, कोच नंबर 5360 मधून प्रेशर गळतीचा आवाज येत होता. त्यांनी लेडीज डब्यात तैनात असलेल्या होमगार्ड जवानाला सोबत घेऊन मागे जाऊन पाहणी केली. तेव्हा रेल्वे रुळावर लोखंडाचा मोठा चौकोनी बॉक्स अडकल्याचे दिसून आले. होमगार्डच्या मदतीने हा लोखंडी बॉक्स तात्काळ रेल्वे रुळावरून बाजूला करण्यात आला. यादरम्यान, सुमारे 10 ते 15 मिनिटे रेल्वे वाहतूक थांबली होती. त्यानंतर ट्रेन मॅनेजर यांनी याची माहिती इमर्जन्सी कंट्रोल आणि कंट्रोलला देऊन गाडी सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रवाना केली.
ट्रेन मॅनेजर संतोष जाधव यांच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले असून, त्यांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, उल्हासनगर-अंबरनाथ आणि अंबरनाथ-बदलापूर दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामातील हा लोखंडी तुकडा रुळावर आला कसा? तो खाली पडला की कोणी मुद्दाम ठेवला होता? यादृष्टीने रेल्वे सुरक्षा दल व पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहेत.







