मात्र वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन
| मुंबई | वृत्तसंस्था |
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात घटले आहेत. परंतु, वाहने सुसाट धावत असल्याने वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर दक्षता घेऊन रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलिसांनी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. यात अपघातग्रस्त ठिकाणी ठराविक अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे, वेग मोजण्यासाठी स्पीड गनचा वापर, गतिरोधक पट्टे, धोकादायक ठिकाणी सूचना फलक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, आदी उपाययोजना करण्यात आल्याने यावर्षी होणाऱ्या अपघातात निम्म्याने घट झाल्याचे दिसून येते.
महामार्ग पोलिस व परिवहन विभागानेही वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर संयुक्त दंडात्मक कारवाई केली. यातून काही मंत्री व वरिष्ठही सुटले नाहीत. याचा फायदा अपघातांची संख्या घटली आहे. परंतु, वाहनचालकांची वाहने अद्याप सुसाटच धावत आहेत. द्रुतगती मार्गावर हलक्या वाहनांसाठी वेगमर्यादा ताशी 100 किलोमीटर, तर जड वाहनांसाठी ताशी 80 किलोमीटरची असतानाही हा नियम अनेकजण मोडताना दिसून येत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होतेच, तरीही वेग मर्यादेचे उल्लंघन केले जात असल्याने पोलिसांची डोकेदुखी कायम आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी राज्य महामार्ग पोलिसांनी फ्रान्स बनावटीचे ‘मेस्टा फ्यूजन’ हे स्वयंचलित यंत्र देशात सर्वात प्रथम येथील महामार्गावर बसवले आहे. हे यंत्र वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती छायाचित्रांच्या पुराव्यासह एका क्लिकवर उपलब्ध करून देते. संबंधित वाहनांचे छायाचित्र टिपल्यानंतर महामार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये ते काही सेकंदातच उपलब्ध होते. संबंधित वाहनचालकाला एक हजार रुपयांचा दंड आणि त्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाटवला जातो.
द्रुतगती महामार्गावर बोर घाटात चढणामुळे वाहनांचा वेग मंदावतो. परिणामी अवजड वाहने ही मंद गतीने हे चढण चढतात. त्यामुळे या ठिकाणी चारचाकींचा खोळंबा होतो. त्या कोंडीतून बाहेर पडल्यानंतर वाहनचालक वेळ वाचवण्याच्या नादात सुसाट वाहने पळवतात. त्यावेळी मार्गावरील स्वयंचलित कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो काढतात. त्यानंतर संबंधिताच्या मोबाईलमध्ये दोन हजार रूपये दंड झाल्याचा संदेश झळकतो.
गेल्या पाच वर्षांत झालेले अपघात 2019 अपघात- 60 जखमी- 210 मृत्यू- 61 2020 अपघात- 53 जखमी- 207 मृत्यू- 60 2021 अपघात- 40 जखमी- 87 मृत्यू- 40 2022 अपघात- 33 जखमी- 130 मृत्यू- 50 2023 डिसेंबर अखेर अपघात- 15 जखमी- 34 मृत्यू- 23