| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थस्थळी भक्तिभावाने वाहिलेल्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याच्या उपक्रमात यशस्वी होऊन, आता सेंद्रिय खतनिर्मितीची अत्यंत अभिनव योजना हरेश्वर विश्वस्तांनी सुरू केली आहे. या स्तुत्य उपक्रमात पुढाकार घेणारे कोकण किनारपट्टीवरील हे पहिलेच मंदिर आहे.
देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून दक्षिण काशी अशी ओळख असणार्या हरिहरेश्वर येथे भक्तगणांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. येथे दर्शनाला आलेल्या भक्तांकडून देवाच्या चरणी फुलं, बेलपत्र वाहिले जातात. गेले कित्येक वर्षे मंदिरातील निर्माल्य सिंधु सागरात विसर्जित करण्यात यायचे. मात्र, आता भाविकांची वाढती गर्दी पाहता निर्माल्य जास्त प्रमाणात होत असल्याने याचे विघटन कसे करावे, याचा विचार करण्यात आला. त्यानंतर सुगंधी अगरबत्ती तयार होऊन मंदिर परिसरात श्रद्धेचा सुगंध दरवळला आहे.
हरिहरेश्वर हे शंकराचे स्थान आहे. फुलांप्रमाणे बेलपत्रदेखील मोठ्या प्रमाणात येते. तसेच येथे विष्णुंचे दैवत असल्याने तुळशीपत्रदेखील वाहले जाते. त्यामुळे फुलांची अगरबत्ती तयार करण्यास मदत झाली. परंतु, बेलपत्र व तुळशीपत्र याचे काय करायचे या विषयावर अभ्यास करण्यात आला. श्रीराम कुंठे यांच्यासमवेत चर्चा करून बेलपत्र व तुळशीपत्र यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे आता लवकरच हे सेंद्रिय खात भाविकांना मंदिराच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
मंदिरात येणारी प्रत्येक गोष्ट जसे की फुल, बेलपत्र, तुळशीपत्र, नारळ त्याचप्रमाणे प्लास्टिक यांचा वापर करून त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करून लोकांचे उपयोगात कसे आणता येईल यावर मंदिर संस्थान अभ्यास करत आहे व त्यानुसार नियोजन करत आहे. यामुळे परिसरात स्वच्छता राखणे व पर्यावरणपूरक गोष्टी तयार करणे, यावर सध्या भर दिला जात आहे, असे हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान सचिव सिद्धेश पोवार यांनी सांगितले.