योजना करा, पण शेतकर्‍यांना चिरडून नको!

जलजीवन मिशन योजनाची धक्कादायक माहिती समोर

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यात जवळपास 106 जलजीवन मिशन अंतर्गत योजना सुरू आहेत. त्यातील जेमतेम दहा ते बारा योजना पूर्ण झाल्या आहेत. पूर्ण झालेल्या योजनांमध्येदेखील अनेक त्रुटी आहेत. अनेक योजना ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे अपुर्‍या स्थितीत आहेत. तर काही योजना कागदावरच आहेत. तर काही ठिकाणी योजना पूर्ण व्हाव्यात म्हणून स्थानिक शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. अशीच एक योजना आमटेम ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिव वाडी, पाचआंबा, लांगी वाडीमध्ये सुरू आहे. बेजबाबदार अधिकार्‍यांच्या व गाव नेत्यांच्या जोरावर ठेकेदार सुशील निकम या ठेकेदाराने काम सुरूच ठेवले आहे. काम तातडीने बंद न झाल्यास शेतकर्‍यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

याबाबत हकीकत अशी की, शेतकरी जगदीश मोकल आणि रवींद्र मोकल यांच्या मालकीच्या जागेवर कोणतीही पूर्वसूचना न देता या योजनेचे काम सुरू केले असून, शेतकरी काम थांबवायला गेल्यास त्यांच्यावर ठेकेदाराच्या माणसाने हल्ला चढवून उलट ठेकेदाराने शेतकर्‍यावरच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. अधिकारीवर्गालादेखील ठेकेदाराकडून धनलक्ष्मीचा दर्शन होत असल्याने कोणतीच कागदपत्र तपासत नाहीत, असा शेतकर्‍यांचा आरोप आहे. नियमानुसार जागा मालकाचे संमतीपत्र व दाखला घेणे गरजेचे होते; परंतु अधिकार्‍यांनी काही न पाहता काम सुरू करण्याची परवानगी दिली. साधारणतः हे काम 1 कोटी 7 लाख रूपये किमतीचा असून, याचा ठेकेदार सुशील गोरख निकम बीड येथील आहे. तसेच या ठेकेदाराने सदरील काम घेताना 9 टक्के बिलो (कमी) ने घेतला आहे. त्याला काही झाले तरी कसे ही काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे तो गाव नेत्यांनादेखील लक्ष्मी दर्शन घडवत आहे, अशी चर्चा आहे. अधिकारी आणि गाव नेते मिळून शेतकर्‍यावर अन्याय करत आहेत. शेतकरी जगदीश मोकल आणि रवींद्र मोकल यांनी 20 मे रोजी रितसर वकिलामार्फत नोटीसदेखील दिली आहे. त्यामध्ये उल्लेख केला आहे की, जगदीश मोकल आणि रवींद्र मोकल यांच्या मालकीचा सर्व्हे नं. 81/01/ब/02 मध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असल्याने तात्काळ काम बंद करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

मी ग्रामपंचायतीला रितसर पत्र दिलेले आहे. तसेच आमचे शाखा अभियंता यांनादेखील त्यामध्ये लक्ष घालायला सांगितले आहे. कुणावर अन्याय होऊन देणार नाही.

आर.जे. पाचपोर,
उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टाकीचे बांधकाम आमच्या जागेत आहे. काम सुरू होताच त्यावर आम्ही हरकत घेऊन काम बंद करण्यास सांगितले होते. आमची जागा नसेल तर बांधकाम करण्यास आमचा अडथळा नाही. परंतु, ही जागा आमची आहे, त्याठिकाणी बांधकाम आम्ही होऊ देणार नाही. जर दडपशाहीने बांधकाम केले, तर आम्ही सर्वजण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू.

जगदीश मोकल,
शेतकरी

आम्ही तातडीने काम बंद केले आहे. नक्की जागा कुणाची आहे हे निश्‍चित झाल्याशिवाय काम सुरू केले जाणार नाही.

आर.एन. राठोड,
शाखा अभियंता
Exit mobile version