| अलिबाग | प्रतिनिधी |
देशात सध्या संविधान व लोकशाहीविरोधी वातावरण निर्माण होऊ लागले आहे. हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल आहे. त्यामुळे या निवडणुकीत संविधान व लोकशाहीविरोधी तसेच हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीला उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी मतदारांसह कार्यकर्त्यांना केले.
भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया आघाडीचा अधिकृत घटक पक्ष आहे. पक्षाचा सरचिटणीस म्हणून मी स्वतः इंडिया आघाडीमध्ये पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. इंडिया आघाडीतील महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या पक्षांच्या सहभागाने महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक लढवित आहे. महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचा सक्रीय पाठिंबा आहे. ही निवडणूक हुकूमशाही विरुध्द लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीचा पराभव घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले आहे. संयुक्त प्रचार सभेत सहभागी व्हावे, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.